कॅप्टन स्मित मच्छार यांना उपचारासाठी दुबईला हलवले   

अबु धाबी : दुबईहून तेल अवीवला जाणार्‍या फ्लाईदुबईच्या प्रवासी विमानात झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले भारतीय मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांना पुढील उपचारांसाठी सौदी अरेबियातून दुबईला हलवण्यात आले आहे. सौदी अरेबियातील तबुक येथील रुग्णालयात प्राथमिक शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
 
मच्छार यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी संयुक्त अरब अमिरातमधील भारताचे राजदूत डॉ. दीपक मित्तल आणि कॉन्सुल जनरल डॉ. ई. विष्णु वर्धन रेड्डी यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दूतावास आणि  वाणिज्य दुतावास स्थानिक अधिकार्‍यांच्या सतत संपर्कात असून, कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
उड्डाणादरम्यान हल्ल्यात डोके आणि हातांवर गंभीर दुखापत होऊनही मच्छार यांनी कॉकपिटचा ताबा कायम ठेवला होता. विमान तबुक विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. अधिक वैद्यकीय सुविधांसाठी तसेच कुटुंबीयांच्या उपस्थितीत पुढील उपचार करता यावेत, यासाठी त्यांना आता दुबईला हलवण्यात आले आहे.

इस्रायल करणार विशेष सन्मान

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्मित मच्छार यांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. गंभीर जखमी असूनही मच्छार यांनी हल्लेखोराचा सामना केला. ते खरे नायक आहेत, असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे. दरम्यान, मच्छार यांच्या शौर्याचा इस्रायल सरकारकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे. संकटसमयी मदतीला धावून येणार्‍या मित्रांना इस्रायल कधीही विसरत नाही, असे भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अजार यांनी सांगितले.  

मोदींचा शौर्याला सलाम

विमानात सहवैमानिकाने केलेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी होऊनही विमानावरील नियंत्रण कायम ठेवत १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणार्‍या स्मित मच्छार यांच्या धैर्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये मोदी यांनी कॅप्टन मच्छार यांना ‘हिरो’ संबोधत, गंभीर दुखापत आणि जीवाला धोका असतानाही त्यांनी दाखवलेले धैर्य व अढळ निर्धार प्रेरणादायी असल्याचे म्हटले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आणि मोठी दुर्घटना टळली, असेही मोदी यांनी नमूद केले.
 

Related Articles