पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला   

इस्लामाबाद : अफगाणिस्तानातील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) कथित तळांवर पाकिस्तानने हवाई हल्ला केला. यात २२ बंडखोर ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केला. मात्र, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने या हल्ल्यात महिला आणि मुलांसह नऊ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आणि ११ जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. 
 
पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातील दोन ठिकाणी टीटीपीचे तळ आणि आश्रयस्थाने लक्ष्य करण्यात आली. ही कारवाई नियोजनबद्ध आणि अचूक पद्धतीने करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. हल्ल्यांत २२ बंडखोर ठार झाले तसेच संबंधित ठिकाणी असलेला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा नष्ट करण्यात आला. कारवाईदरम्यान अन्य नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेतल्याचाही दावा करण्यात आला.
 
तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले, कुनार प्रांतातील शुल्तान जिल्ह्यातील चुगाम आणि हेलमंड प्रांतातील गर्मसिर जिल्ह्यातील सफर येथे पाकिस्तानने हल्ले केले. यात तीन घरे उद्ध्वस्त झाली. महिला आणि मुलांसह नऊ अफगाण नागरिकांचा मृत्यू तर ११ जण जखमी झाले, असा दावा मुजाहिद यांनी केला.  

टीटीपीवरून दोन्ही देशांत तणाव

अफगाणिस्तानातील तालिबान प्रशासन टीटीपी आणि त्याच्याशी संबंधित सशस्त्र गटांना आश्रय देत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानमधील हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी होत असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. 

Related Articles