जगावर गंभीर अन्नसंकटाचे सावट : जयशंकर   

युद्ध, व्यापार मार्गांतील अडथळे आणि हवामान बदलाचा परिणाम

वॉशिंग्टन : येत्या काही महिन्यांत जगाला गंभीर अन्नसंकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. युद्धांमुळे प्रमुख धान्य निर्यातदार देशांच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून अन्नधान्याबरोबरच इंधन, खते आणि आर्थिक उपलब्धतेच्या आघाडीवर विकसनशील देशांवरील दबाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
संयुक्त राष्ट्र महासभेच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर न्यूयॉर्कमध्ये आयोजित कार्यक्रमात जयशंकर बोलत होते. सध्याच्या परिस्थितीत विकसनशील देशांना ‘४ एफ’ म्हणजेच फूड (अन्न), फ्युएल (इंधन), फर्टिलायझर (खते) आणि फायनान्स (अर्थपुरवठा) या चार आघाड्यांवर गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
युक्रेन तसेच इराण आणि आखाती प्रदेशातील संघर्ष, आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गांतील अडथळे आणि बदलते हवामान यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. जगातील काही प्रमुख धान्य निर्यातदार देशांना त्यांचा माल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवणे कठीण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.जयशंकर पुढे म्हणाले, खतांची टंचाई आणि एल निनो हे घटक एकाच वेळी परिणाम करू लागल्यास येत्या काही महिन्यांत अन्नधान्याच्या उपलब्धतेवर मोठा दबाव निर्माण होऊ शकतो. रशिया आणि युक्रेन हे जागतिक बाजारातील गहू आणि अन्य धान्यांचे प्रमुख पुरवठादार आहेत. मात्र, काळ्या समुद्रातील बंदरे आणि जहाज वाहतुकीच्या मार्गांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे निर्यातीवर परिणाम होत आहे.
 
सप्टेंबरमध्ये रशियाची गहू निर्यात १० लाख टनांपर्यंत घसरली असून, गेल्या वर्षी याच काळात ती ५० लाख टन होती. युक्रेनची निर्यातही निम्म्यावर आल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुरवठ्यातील या अडथळ्यांमुळे जूनपासून जागतिक बाजारातील गव्हाच्या किमती वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. काळ्या समुद्रातील मार्गांना पर्याय म्हणून युक्रेनकडून बाल्टिक बंदरांमार्फत धान्य वाहतुकीचे पर्याय शोधले जात आहेत. 
 

Related Articles