आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगर समुद्रात बुडून मृत्यू   

अलिबाग/आळंदी : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी हृदयद्रावक दुर्घटना घडली. तीर्थक्षेत्र आळंदी येथील विनर्स अकॅडमी अ‍ॅण्ड स्टडी सेंटरच्या शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. समुद्रातील पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे आळंदीसह पुणे आणि रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
 
तन्मय दत्तात्रय वाहिले, सुमित भरत अहिरे, प्रणव रामदास बनसोडे, कैवल्य सतीश वासनकर, राजवीर युवराज वाहिले, यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर आणि कौस्तुभ संदीप दौंड अशी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
 
आळंदी येथील विनर्स अकॅडमी अ‍ॅण्ड स्टडी सेंटरमधील अकरावीच्या विद्यार्थ्यांची कोकणात शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीत २५ विद्यार्थी, १७ विद्यार्थिनी आणि ६ शिक्षक असे एकूण ४८ जण सहभागी झाले होते. गुरुवारी दुपारी दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिवेआगर समुद्रकिनारी विद्यार्थी पर्यटनाचा आनंद घेत होते. त्यावेळी काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा आणि भरतीचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी अचानक समुद्राच्या वेगवान प्रवाहात ओढले गेले आणि बुडाले.
 
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि जीवरक्षक दलांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. त्यांनी समुद्रात शोध घेत आठही विद्यार्थ्यांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीनंतर विद्यार्थ्यांना मृत घोषित केले.
 
या घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी पोलिस व आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. केळगांव, आळंदी, चर्‍होली खुर्द गावातील ग्रामस्थांकडून मृत्युमुखी पडलेल्या मुलांना आज (शुक्रवारी) श्रद्धांजली वाहण्यासाठी गाव बंद ठेवले आहे.
 
रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी, दिवेआगार येथे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या विनर्स अकॅडमी, आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद आणि पीडादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्व कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. हे सर्व विद्यार्थी आळंदी येथील असून, त्यांचे पार्थिव आळंदी येथे नेण्यासाठी स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत.
 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 

Related Articles