पोलिसांनी परवानगी नाकारली तरी शिवाजी पार्कवरच सीजेपीचे आंदोलन   

मुंबई, (प्रतिनिधी) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसाठी विरोधी पक्षांनी देशभरात आंदोलन सुरू केलेले असताना कॉक्रोच जनता पार्टीनेही (सीजेपी) आज (शुक्रवारी) गांधी जयंती दिनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी तेथेच आंदोलन करण्यावर सीजेपी नेते अभिजित दिपके ठाम आहेत. दिल्लीत अमित शहांनी जी चूक केली ती देवेंद्र फडणवीस यांनी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
 
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची पक्षपाती भूमिका व एसआयआरच्या माध्यमातून मतदार यादीतील लाखो नावे वगळण्याच्या कारस्थानाविरोधात सध्या देशभर आंदोलने सुरू आहेत. सीजेपीने दादर येथील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला विरोध केला आहे. मात्र, कॉक्रोच जनता पार्टी तेथेच आंदोलन करण्यावर ठाम आहे. पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी तेथेच सीजेपी जेलभरो आंदोलन करणार असल्याचे दीपके यांनी सांगितले. 
 
शिवाजी पार्कवर फडणवीस रॅली काढू शकतात, मग आम्हाला तिथे आंदोलन करायला परवानगी का नाही? मला ३ दिवस नाही तर ३ महिने कारागृहाते ठेवा, मी बाहेर येऊन पुन्हा रस्त्यावर उतरून संघर्ष करेन, असा इशारा त्यांनी दिला. ज्या यंत्रणेवर देशात निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे, तीच यंत्रणा एका पक्षाची हस्तक झाली आहे. 

Related Articles