मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन   

१५२ चित्रपट होणार प्रदर्शित; प्रवेश विनामूल्य 

पुणे : मुंबा फिल्म फाउंडेशन आयोजित सातवा मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ६ ते १० ऑक्टोबर या कालावधीत  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे होणार आहे. ४१ देशांमधून आलेल्या ९८७ चित्रपटांमधून १५२ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे आयोजक जय भोसले आणि महोत्सव संचालक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
महोत्सवाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक अवचार, सहसचिव रोहितराव नरसिंगे, श्रुती शेंबेकर, प्रियांका चौधरी, रेणुका अग्रवाल तसेच मराठवाडा महाविद्यालयाच्या प्रतिनिधी नूतन कुलकर्णी उपस्थित होते. यंदाच्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांचा थेट सहभाग असल्याने महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी मिळाली आहे. चित्रपट रसिकांना महोत्सवात विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. 
 
६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता व्ही. शांताराम १२५’ निमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘द पोर्ट्रेट ऑफ अ पायोनियर’ हा लघुपट दाखविला जाणार आहे. मधुरा जसराज यांचे दिग्दर्शन आहे. सकाळी ११ वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे या महोत्सवाचे उद्घाटन व्ही. शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक प्रकाश मगदुम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महोत्सवाची सुरुवात ‘द महाराष्ट्र फाईल’ या चित्रपटाने होणार आहे.
 
विक्रम गोखले यांंच्या स्मरणार्थ यंदापासून विक्रम गोखले सन्मान सुरू करण्यात आला असून पहिल्या सन्मानाच्या मानकरी ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहेत. या निमित्ताने सोनाली कुलकर्णी यांच्या ‘लाईक मां’ हा नवीन लघुपट दाखविला जाणार आहे. समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून फिल्म अँण्ड टेलिव्हिजनचे कुलगुरू धीरज सिंह यांची उपस्थिती असणार आहे. त्यांच्या हस्ते पारितोषिक प्राप्त लघुपटांचा सन्मान केला जाणार आहे.
 

Related Articles