‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू   

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेआधीच अर्थात गुरूवारी  पुण्यात आंदोलनाला सुरूवात केली. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यावर निर्णय झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार आंदोलक विद्यार्थ्यांनी केला.
 
मागील काही दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने, मोर्च काढले जात आहेत. गणेशोत्सवानंतर पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली होती. परंतु पुण्याचे पोलिस आयुक्तांच्या विनंतीनंतर आ. रोहित पवार यांनी गांधी जयंतीदिनी आज (शुक्रवारी) आंदोलनाची हाक दिली. तत्पुर्वी आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी आमंत्रित केले. चर्चेतून काही मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला. मात्र, एमपीएससीच्या अध्यक्षांना हटविण्याच्या मागणीवर ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आ. पवार यांच्यासह शिष्टमंडळाने गुरूवारी पुण्याच्या शास्त्री रोड परिसरात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी तात्पुरता स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
आंदोलनात आमदार रोहित पवारांसह स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. एस.एम.जोशी पुल याठिकाणी आंदोलक विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. 
२ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली होती. परंतू, आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधल्यानंतर १ दिवस अगोदरच आंदोलनाला सुरूवात केली. यास पोलिसांची परवानगी नसल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी आमदार पवारांशी चर्चा करून आंदोलन थांबविण्याची विनंती केली. परंतू, पवार आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्तात आंदोलन सुरू होते.
 
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला एका व्यक्तीकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला. यानंतर आंदोलनस्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. प्रसारमाध्यमांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत आंदोलनाच्या प्रक्षेपणास नकार दिला. तसेच संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विद्यार्थी प्रतिनिधींकडे केली.
 

Related Articles