महिलांच्या सुरक्षेसाठी २४ तास ‘महिला हेल्पलाइन’ची मागणी   

पुणे : दिल्लीतील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच देशभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी बुधवारी शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, पीडितांना न्याय मिळावा आणि आरोपींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
 
विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला, पुरुष आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. हे आंदोलन केवळ दिल्लीतील घटनेपुरते मर्यादित नसून पुण्यासह देशभरातील महिलांवरील अत्याचारांविरोधात एकजूट दाखविण्यासाठी करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
 
महिलांच्या सुरक्षेसाठी देशभर २४ तास कार्यरत महिला पोलीस हेल्पलाइन सुरू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या हेल्पलाइनवर महिला पोलीस अधिकार्‍यांनी तक्रारी स्वीकाराव्यात आणि गरजेनुसार घटनास्थळी तातडीने मदत पोहोचवावी, अशी मागणी करण्यात आली. पुण्यात स्वतंत्र महिला पोलीस दल उभारण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलक आरबाज शेख म्हणाले, महिला आणि पुरुषांना समान अधिकार मिळाले पाहिजेत. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे प्रभावी पाठबळ आवश्यक आहे. सध्या १०९१ महिला हेल्पलाइन उपलब्ध असली तरी अनेकदा त्याला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रभावी आणि २४ तास कार्यरत यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
 
शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यासाठी सुरुवातीला परवानगी देण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यास परवानगी मिळाल्याचे शेख यांनी सांगितले.
 

Related Articles