आता ‘एटीएम’मधूनच मिळणार ‘डेबिट कार्ड’   

वृत्तवेध

बँकेमध्ये खाते उघडल्यानंतर साधारणपणे काही दिवसांमध्ये डेबिट किंवा ‘एटीएम’ कार्ड ग्राहकाच्या घरी पाठवले जाते. काही बँकांकडून आता एका दिवसातही कार्ड उपलब्ध करून दिले जाते; मात्र लवकरच ग्राहकांना थेट एटीएममधूनच डेबिट कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कार्ड मिळवण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. नव्या सुविधेचा मुख्य उद्देश ‘डेबिट कार्ड’ जारी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद करणे हा आहे. सध्या नवीन ‘डेबिट कार्ड’ मिळवण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत अर्ज करावा लागतो. त्यानंतर कार्ड तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवस लागू शकतात. ‘एटीएम’च्या माध्यमातून कार्ड उपलब्ध झाल्यास ग्राहकांना अधिक जलद मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः तातडीने ‘डेबिट कार्ड’ची गरज असलेल्या ग्राहकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरू शकते. ही व्यवस्था सुरू झाल्यानंतर ग्राहकांना डेबिट कार्डसाठी प्रत्येक वेळी बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता राहणार नाही. जवळच्या ‘एटीएम’मधूनच ‘डेबिट कार्ड’ मिळवता येणार आहे. यामुळे ग्राहकांचा वेळ वाचण्यासोबतच कार्ड जारी करण्याची प्रक्रिया अधिक सोयीची होईल. बँकांच्या शाखांवरील कामाचा ताणही कमी होण्याची शक्यता आहे. नवीन सुविधा केवळ नवीन खातेधारकांसाठीच मर्यादित राहणार नाही. डेबिट कार्ड हरवले असेल किंवा त्याची मुदत संपली असेल, तरी ग्राहक या सुविधेचा वापर करून नवीन कार्ड मिळवू शकतील. यासाठी बँकेच्या शाखेत वारंवार जाण्याची गरज नसेल. ग्राहक जवळच्या ‘एटीएम’वर जाऊन ‘डेबिट कार्ड’साठी अर्ज करू शकतील आणि नव्या व्यवस्थेनुसार कार्ड तिथूनच मिळण्याची शक्यता आहे.
 
‘एटीएम’च्या माध्यमातून डेबिट कार्ड जारी करण्याची सुविधा सुरू झाल्यास बँकिंग सेवा अधिक आधुनिक आणि ग्राहकाभिमुख होण्यास मदत होईल. ग्राहकांना मोक्याच्या ठिकाणी आणि कमी वेळेत सेवा मिळू शकेल. याशिवाय, ‘डेबिट कार्ड’ जारी करण्यासाठी बँक शाखांमध्ये होणारी गर्दी आणि कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण कमी होण्यासही मदत होऊ शकते. डिजिटल बँकिंगच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर ‘एटीएम’मधून थेट ‘डेबिट कार्ड’ मिळण्याची सुविधा ही ग्राहकांसाठी महत्त्वाची सोय ठरणार आहे.
 

Related Articles