वाचक लिहितात   

संपूर्ण कर्जमाफीच हवी

यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये भीषण दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून संसाराचा गाडा कसा हाकायचा? असा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला आहे. पिके पूर्णपणे धोक्यात आली आहेत, तर काही ठिकाणी पाण्याविना पूर्णपणे करपली आहेत आणि जी आहेत त्यांची वाढ खुंटली आहे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सातत्याने हवामानातील बदलामुळे शेतकर्‍यांना फटका बसत आहे. पावसावरील शेती पूर्णपणे धोक्यात आली आहे. कर्नाटक राज्यात ८९ तालुके तीव्र दुष्काळग्रस्त तर १२ मध्यम दुष्काळग्रस्त असे राज्याच्या २४ जिल्ह्यातील १०१ तालुके दुष्काळग्रस्त सरकारने घोषित केले आहेत; मात्र नुसते घोषित करून उपयोग नाही, तर शेतकर्‍यांना यातून सावरण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण कर्जाची सरसकट माफी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा.

राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव

रेल्वे कामगारांचे कौशल्य

रेल्वे प्रवास हा सर्वसामान्य ते श्रीमंत व्यक्ती सर्वांसाठी सुरक्षित व आरामदायी प्रवास समजला जातो. त्यामुळे रेल्वे ही जीवनदायनी बनली आहे आणि रेल्वेचा प्रवास हा जास्तीत जास्त सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग खूप प्रयत्न करत असतात. यामध्ये रेल्वेलाईनची दुरुस्ती व देखभाल करण्याचे काम सर्वांत जास्त अवघड असते. या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली तर मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे हे काम करताना ते काम करणारे सर्व कुशल कारागीर आणि अभियंते जीवापाड मेहनत घेऊन ते काम पूर्ण करत असतात आणि त्यामुळेच रेल्वे विभाग आपल्या सर्व रेल्वे प्रवाशांना आज गेली अनेक वर्ष चांगली सेवा देत आहे. या सेवेमध्ये या कर्मचार्‍यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान सर्व सुख सोयी मिळाव्यात आणि त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी हे कामगार दिवस-रात्र काम करत असतात.

विजय आकुर्डेकर, बिबवेवाडी

सरकारला उशिरा जाग

पावसाने ओढ दिली, डोळ्यादेखत पिके करपली. शेतकरी कुटुंबांना नुकसानभरपाई मिळणे तर दुरापास्तच दुष्काळी आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केले. ही अस्वस्थता शिगेला पोचली तसे राजकीय नेत्यांना बांधावर जाण्याचे भान आले. मुख्यमंत्र्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न करताना एक शेतकरी रडून माहिती सांगतो हा व्हिडिओ व्हायरल झाला.

नीलम सांगलीकर, पुणे.

वरदविनायक मंदिराची दुरवस्था 

महड, जि. रायगड येथील गणपतीला सहकुटुंब दर्शनास जाण्याचा योग आला. गर्दी अधिक नव्हती. गणपतीच्या शेजारीच उजव्या हाताला लागूनच असलेल्या देवीच्या देवळात दर्शनास गेल्यावर मात्र तेथील दुरवस्था नको वाटावी अशी होती. देवीच्या देवळात काहीच स्वच्छता नव्हती. अतिशय कुबट वास येत होता. गणेश उत्सव सुरू असताना अष्टविनायकांपैकी एक गणपती असूनही मंदिराची दुरवस्था का असावी? भाविक मोठ्या श्रद्धेने देवस्थानास देणग्याही देतात. मग मंदिरे स्वच्छ असणे ही तर प्राथमिक गरज आहे.

आदिती देखणे, नवीन पनवेल.

मोबाईल संस्कृतीमुळे नाती दुरावली!

आज मोबाईलमुळे अख्खे जग जवळ आले; पण नाती दुरावली. पूर्वी माणसांकडे साधे मोबाईल होते. माणसांचा माणसांशी संवाद होत होता. जिव्हाळा आपुलकी होती. पूर्वी मनोरजंनासाठी टीव्ही, रेडिओ साधने होती. माणसे आवर्जून एकोप्याने कार्यक्रम पाहायचे; परंतु गेल्या काही वर्षात घरोघरी स्मार्टफोन आले आणि टीव्हीची जागा मोबाईलने घेतली. स्मार्टफोनमुळे अक्षरश: लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सार्‍यांनाच वेड लावले आहे. या मोबाईल क्रांतीने जग जवळ आणले; पण माणसे दुरावत चालली. मोबाईलने माणसाचे जीवन बदलले. आज मोबाईलवर संभाषणाला भरपूर वेळ आहे; परंतु माणसांना एकमेकांजवळ बसून बोलायला वेळ मिळत नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे.

संतोष शिंदे, मु.पो.काष्टी, ता.श्रीगोंदे

गणेशोत्सवातील विरोधाभास

पुणे सार्वजनिक गणेशोत्सव वैभवशाली परंपरेला यंदा उच्चांकी वेळ आणि दणदणाटाची किनार लाभली. गणेश मिरवणुकीस तब्बल ३३ तास २७ मिनिटे इतका उच्चांकी वेळ लागला. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी दीड दिवस बंद राहिले. तर दणदणाटाची सरासरी १०४ डिसिबलची नोंद झाली. उत्सव काळात २०० गणेश मंडळांच्या ठिकाणी केलेल्या तपासणीत सर्वत्र आवाजाची पातळी क्षमतेपेक्षा जास्त नोंदवण्यात आली. एकीकडे सरकार - प्रशासनाचा गर्दी नियंत्रणावर भर, दणादणाटावर करडी नजर असा निग्रह तर दुसरीकडे गणेशोत्सव काळात विशेष बससेवा, गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवा, उत्सव काळात दणदणाटात भर असा विरोधास देखील दिसून आला. गणेशोत्सवाला राजकीय परिमाणे आणि परिणामेच इतकी जबरदस्त आहेत की निर्बंध सैल करण्यातच यंत्रणा धन्यता मानताना दिसतात. गणेशोत्सव इव्हेन्टीकरणातून निर्माण झालेले उन्मादाचे ओझे संस्कृतीवर येऊन पडलेले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या काही वर्षांत समाजप्रबोधनाची व सांस्कृतिक संवर्धनाची रूळलेली वाट सोडून इव्हेंन्टीकरणाची वाट धरून गणेशोत्सव म्हणजे ’प्रतिष्ठितपणे करावयाचा मनुष्य शक्तीचा सार्वजनिक अपव्यय व निरूद्देश शक्तिप्रदर्शन’ असा प्रकार झाला आहे. 

बाळकृष्ण शिंदे, पुणे

 

Related Articles