E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
इराण-अमेरिका युद्धाने जग होरपळत असतानाच १८० इस्रायली प्रवाशांना घेऊन इस्रायलची राजधानी तेल अविवकडे झेपावलेल्या विमानाने उड्डाणानंतर काही वेळातच ‘अपहरण’ झाल्याचा संदेश नियंत्रण कक्षाकडे पाठवला आणि हवाई वाहतूक क्षेत्रासह सर्वच आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या काळजाचा ठोका चुकला. सदैव युद्धसज्ज असलेल्या इस्रायलने विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने लढाऊ विमाने सज्ज ठेवली. मात्र, काही वेळातच सहवैमानिकाने मुख्य वैमानिकाला चाकूने भोसकल्याचे समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. हल्लेखोर सहवैमानिक ओमानचा असून वर्षभरापूर्वीच तो ‘फ्लायदुबई’ कंपनीत रुजू झाल्याचे समजते. तर, मुख्य वैमानिक भारतीय वंशाचा असून त्यांचे नाव स्मित मच्छार आहे. त्यांनी १० वर्षे ‘स्पाइसजेट’ कंपनीमध्ये काम केले होते. १८० प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या स्मित यांनी आता जगभरात भारताची मान उंचावली आहे. व्यावसायिक वैमानिक असलेल्या स्मित यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्मित मच्छार मूळचे मुंबईकर
अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्यासारख्या भीषण दुर्घटनेपासून १८० प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार हे मूळचे मुंबईकर असून, त्यांना भारतीय आकाशात विमान उडवण्याचा दहा वर्षांचा अनुभव आहे. 'फ्लाय दुबई'चे विमान कोसळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमानी सह-वैमानिकाने केलेल्या चाकूच्या हल्ल्याचा प्रतिकार करुन स्मित यांनी त्याला रोखले. बुधवारी दुपारी मच्छार यांचे आई-वडील आपल्या मुलाला भेटण्यासाठी टिळक नगर येथील घरातून सौदी अरेबियाकडे रवाना झाले.
मच्छार यांनी १० वर्षांहून अधिक काळ मुंबईतून 'स्पाइसजेट'साठी बोईंग विमाने चालवली आहेत. या काळात त्यांनी वरिष्ठ कमांडर आणि नंतर प्रशिक्षण देणारे कॅप्टन (ट्रेनिंग कॅप्टन) म्हणून पदोन्नती मिळवली आणि त्यानंतर २०२२ मध्ये ते दुबईला गेले.
दुबई ते तेल अवीव दरम्यान 'फ्लायदुबई'चे विमान FZ1073 चालवताना, त्यांच्या सह-वैमानिकाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि १७४ प्रवासी असलेल्या 'बोईंग ७३७ मॅक्स ८' विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय कॅप्टनवर हल्ला केल्यानंतर सह-वैमानिकाने विमान खाली पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप इस्रायली अधिकाऱ्यांनी केला.
कॉकपीटमधून आरडाओरडा
विमान संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई क्षेत्रात असतानाच कॉकपीटमधून आरडाओरडा ऐकू येऊ लागला. क्रू सदस्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता सहवैमानिकाने मुख्य वैमानिकावर हल्ला केल्याचे दृश्य त्यांना दिसले. या सर्व गदारोळात विमान ३३ हजार फुटांवरून थेट १७ हजार फुटांपर्यंत खाली आले.
सुरुवातीला कॉकपीटमधून हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला ‘७७००’ आणि थोड्या वेळाने ‘७५००’ हे आपत्कालीन संकेतांक (इमर्जन्सी कोड) पाठविण्यात आले. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक क्षेत्रातील नियमांनुसार ‘७५००’ हा इमर्जन्सी कोड बाह्य हस्तक्षेप, म्हणजे अपहरण, म्हणून ओळखला जातो. या संदेशानंतर सर्वत्र खळबळ उडाली.
जखमी अवस्थेतही लढा
जखमी अवस्थेत कॉकपिटच्या जमिनीवर पडलेले असूनही, मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले, त्यामुळे विमानातील इतरांना हस्तक्षेप करणे शक्य झाले. एका क्रू-सदस्याच्या मदतीने प्रवाशांनी कॉकपिटमध्ये प्रवेश केला आणि हल्लेखोराला नियंत्रणात आणण्यास मदत केली.
विमान सुखरुप उतरवले
त्यानंतर विमानात उपस्थित असलेल्या दोन वैमानिकांनी विमान वळवून सौदी अरेबियाच्या तबुक या लष्करी-नागरी विमानतळावर सुखरूप उतरविले. हल्लेखोर सहवैमानिकाला चौकशीसाठी ताब्यात घेत नंतर अटक करण्यात आली. तर, जखमी झालेल्या मुख्य वैमानिकाला रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. ‘९/११’सारखा दहशतवादी हल्ला घडविण्याचा त्याचा कट होता का? अशा बऱ्याच शक्यता वर्तविल्या जात आहेत.
मुंबईत व्यावसायिक कारकीर्द
बुधवारच्या घटनेमुळे स्मित मच्छार यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले असले, तरी त्याआधीपासूनच मुंबई हा त्यांच्या व्यावसायिक प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्यांनी जून २०११ मध्ये 'स्पाइसजेट'मध्ये कामाला सुरुवात केली. या विमान कंपनीसोबत सुमारे ११ वर्षे काम केले. या काळात त्यांनी मुंबईस्थित 'सीनिअर कमांडर' म्हणून सेवा बजावली आणि त्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये ते 'लाइन ट्रेनिंग कॅप्टन' बनले.
या पदावरून त्यांना इतर वैमानिकांना प्रशिक्षण देणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असत. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत 'बोईंग ७३७' श्रेणीतील विमाने ज्यामध्ये ७३७-८०० आणि ७३७ मॅक्स या प्रकारांचा समावेश आहे. त्यांचा एकूण विमाने उडवण्याचा ९,७५० तासांहून अधिक अनुभव आहे.
इस्रायल मित्रांना विसरत नाही...!
कॅप्टन स्मित मच्छार यांचा विशेष सन्मान करणार, पूर्णपणे बरे झाले की...
फ्लाई दुबईच्या प्रवासी विमानात हवेतच झालेल्या रक्तरंजित चाकूहल्ल्यानंतर तब्बल १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्या असीम धैर्याचा इस्रायल सरकारकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे. भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अजार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. इस्रायलच्या राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकांपासून ते लष्करापर्यंत प्रत्येक जण सध्या भारतीय कॅप्टनच्या शौर्याचे कौतुक करत आहे. इस्रायल संकटसमयी मदतीला धावून येणाऱ्या मित्रांना कधीही विसरत नाही, असे सांगत त्यांनी कॅप्टन स्मित यांना अधिकृतपणे सन्मानित केले जाईल असे स्पष्ट केले.
विमान वाचवणाऱ्या ४ इस्रायली प्रवाशांना 'प्रेसिडेंट मेडल'
कॉकपिटमध्ये रक्तरंजित थरार सुरू असताना पुढे धावून जात हल्लेखोर सह-वैमानिकाला जमिनीवर लोळवणाऱ्या चार इस्रायली प्रवाशांच्या शौर्याचीही इस्रायल सरकारने दखल घेतली आहे. इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांनी या चारही प्रवाशांशी थेट फोनवर संवाद साधून त्यांचे आभार मानले.
राष्ट्रपतींनी या चौघांना इस्रायलच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या 'प्रेसिडेंट मेडल फॉर सिव्हिलियन हिरोइझम' (नागरी शौर्याचे राष्ट्रपती पदक) या पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस केली आहे.
कॅप्टन स्मित यांचे पंतप्रधानांकडूनही कौतुक
कॅप्टन स्मित यांच्या या अभूतपूर्व साहसाचे जगभरातून कौतुक केले जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन स्मित यांच्या कुटुंबाशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या शौर्याची प्रशंसा केली, तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही त्यांच्या धाडसाचे मनःपूर्वक आभार मानले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी म्हटले आहे की, मूळचे गुजरातचे असलेले कॅप्टन स्मित यांनी आपल्या असामान्य पराक्रमाने संपूर्ण देशाचे आणि गुजरात राज्याचे नाव जगात उज्ज्वल केले आहे.
गुजरात सरकार करणार 'विशिष्ट गुजरात गरिमा सन्मान' जाहीर
दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानात १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणारे धाडसी पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांना गुजरात सरकारतर्फे सर्वोच्च 'विशिष्ट गुजरात गरिमा सन्मान' (Vishisht Gujarat Garima Award) जाहीर करण्यात आला आहे. हवेत उडणाऱ्या विमानात जीवघेणा हल्ला झाल्यानंतरही कॅप्टन स्मित यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्यामुळे आणि समयसूचकतेमुळे विमानातील सर्व प्रवाशांचा जीव सुरक्षित राहिला. त्यांच्या या वीरतेची दखल घेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या पुरस्काराची घोषणा सोशल मीडियाद्वारे केली.
पुरस्काराचे स्वरूप काय असेल ?
गुजरात सरकार त्यांना या विशेष 'गुजरात गरिमा पुरस्कारा'ने सन्मानित करणार आहे. गुजरात गरिमा पुरस्कार हा गुजरात सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार दरवर्षी 'गुजरात गौरव दिवस' (१ मे - गुजरात राज्य स्थापना दिन) निमित्त आयोजित राज्यस्तरीय समारंभात राज्याचे माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान केला जातो. हा सन्मान प्रदान करताना विजेत्यांना एक विशेष आकर्षक ट्रॉफी (स्मृतिचिन्ह), सन्मानपत्र/प्रशस्तीपत्र आणि शाल देऊन गौरविले जाते. नुकतेच ऑक्टोबर २०२६ मध्ये विमान दुर्घटना टाळणाऱ्या धाडसी पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांना 'विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार' जाहीर करून २५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्याची घोषणा गुजरात सरकारने केली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडूनही स्मित यांच्या शौर्याला सलाम !
सलाम!
मुंबईचा सुपुत्र आणि खरा 'हिरो' — कॅप्टन स्मित मच्छार — यांच्याबद्दल मला अत्यंत अभिमान वाटतो; त्यांनी अत्यंत असाधारण आणि विलक्षण पद्धतीने शेकडो लोकांचे प्राण वाचवले!
भयंकर दुखापत झालेली असतानाही, दुबई ते तेल अवीव या विमान प्रवासादरम्यान स्मित यांनी दाखवलेली प्रसंगावधानता आणि धैर्य खरोखरच अनुकरणीय आहे.
त्या कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षितपणे मार्ग काढण्यासाठी एका टीमप्रमाणे तत्परतेने काम करणाऱ्या सर्व प्रवाशांनाही मी सलाम करतो.
स्मित हे लवकर बरे व्हावेत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी मी कामना करतो!
तुम्ही एक प्रेरणास्थान आहात.
महाराष्ट्र आणि देशाला तुमचा अभिमान वाटतो!
Related
Articles
वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायल अध्यक्षाचा शौर्य पुरस्कार
09 Oct 2026
किल्ला चढताना पर्यटकाचा मृत्यू
12 Oct 2026
पाणीपुरवठ्यासाठी 220 कोटींच्या कामांना मंजुरी
08 Oct 2026
टँकरच्या पाण्याने जगविली फुलशेती; बाजारभावाने केली कोंडी
14 Oct 2026
न्यायालयाच्या निर्देशानंतरही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच
08 Oct 2026
व्हाट्सऍप कट्टा
11 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात