तांदळापासून पदार्थ निर्मिती उद्योगांना जागतिक बाजारपेठेत सुवर्ण संधी   

अब्जावधी डॉलर्सचा व्यापार शक्य; दिल्लीत जागतिक परिषद

नवी दिल्ली :  भारताचा तांदूळ उद्योग आता केवळ निर्यातीपुरता मर्यादित राहणार नाही. तांदळापासून बनवलेले नूडल्स, खाद्यतेल, प्रथिने (प्रोटिन), विशिष्ट घटक आणि औद्योगिक उत्पादने यांच्या वाढत्या बाजारपेठांचा लाभ घेण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. या संदर्भात, सर्वाधिक व्यावसायिक संधी देऊ शकणार्‍या ’मूल्यवर्धित उत्पादनांची’ ओळख पटवण्यासाठी उद्योगाचे एक नवीन मूल्यांकन केले जाणार आहे. या माध्यमातून अब्जावधी डॉलर्सचा व्यापार करता येणे शक्य आहे. 
 
’भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद २०२६’चे आयोजन नवी दिल्लीत २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या मध्ये बियॉन्ड रॉ राइस: द नेक्स्ट बिलियन-डॉलर अपॉर्च्युनिटी या शीर्षकाच्या सत्रात या संभाव्य संधींचा आढावा घेतला जाईल. तांदळापासून बनवलेल्या अनेक उत्पादनांच्या जागतिक बाजारपेठांचा विस्तार होत असतानाच ही पावले उचलली जात आहेत. ’ग्रँड व्ह्यू रिसर्च’च्या अंदाजानुसार, तांदळाच्या नूडल्सची जागतिक बाजारपेठ २०२४ मधील ६.४ अब्ज डॉलर्सवरून २०३० पर्यंत ११ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे; तसेच राइस-ब्रॅन ऑईलची (तांदळाच्या कोंड्यापासून मिळणारे तेल) बाजारपेठ २०२३ मधील ४.८ अब्ज डॉलर्सवरून २०३० पर्यंत ६.३ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.भारताकडे राइस-ब्रॅन ऑईलच्या उत्पादनात वाढ करण्याची मोठी संधी आहे. निती आयोगाच्या २०२४ च्या अहवालात या तेलाची संभाव्य उत्पादन क्षमता १.९ दशलक्ष टन इतकी असल्याचे नमूद केले आहे, ज्यामध्ये सुमारे ८,५०,००० टनांच्या अद्याप न वापरलेल्या क्षमतेचा समावेश आहे. विशिष्ट घटक ही आणखी एक उदयोन्मुख संधी आहे. ’ग्रँड व्ह्यू रिसर्च’नुसार, तांदळापासून मिळणार्‍या प्रथिनांची जागतिक बाजारपेठ २०२३ मधील १६८.५ दशलक्ष डॉलर्सवरून २०३० पर्यंत २८१.४ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या परिषदेत तांदळाच्या पिठासोबतच तांदळापासून मिळणारी प्रथिने आणि ’फंक्शनल स्टार्च’ (विशिष्ट गुणधर्म असलेले स्टार्च) यांचाही आढावा घेतला जाईल. यामध्ये प्रक्रियेच्या गरजा, ग्राहकांच्या अपेक्षा आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य उत्पादन यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. 
 
या संधी केवळ खाद्यपदार्थांपुरत्याच मर्यादित नाहीत. ’ग्रँड व्ह्यू रिसर्च’च्या अंदाजानुसार, भाताच्या तुसाच्या राखेपासून मिळणार्‍या सिलिकाची जागतिक बाजारपेठ २०२५ मधील सुमारे ६४०.६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून २०२३ पर्यंत १.४१ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत दुप्पट होण्याचा अंदाज आहे. २०२५ मध्ये या बाजारपेठेतील महसुलात रबर आणि टायर क्षेत्राचा वाटा सुमारे ४० टक्के होता. 
 

Related Articles