पहलगाम हल्ल्यातील सूत्रधाराचा खात्मा   

श्रीनगर : पहलगाम हल्ल्यातील सूत्रधार महमद आसिफ उर्फ हाशिम मुसा याचा सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे. मुसा हा पाकिस्तानी दहशतवादी होता. त्याचा पहलगामसह अनेक दहशतवादी कारवायांत सहभाग होता. मागील पाच वर्षांपासून सुरक्षा दलाचे जवान त्याचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी रात्री बडगाम जिल्ह्यात एका संयुक्त कारवाईत मुसाला यमसदनी धाडण्यात सुरक्षा दलास यश आले. 
 
मुसा हा पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. तो पाकिस्तानी सैन्याच्या  ’स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप’ (एसएसजी) चा माजी कमांडो होता. त्याने  पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या सुरक्षा ताफ्यातही काम केले होते, अशी माहिती अधिकार्‍यांनी बुधवारी दिली. 
 
मंगळवारी रात्री उशिरा युसमर्ग परिसरातील कोराग येथील डोंगराळ भागात लष्कर आणि इतर सुरक्षा दलांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत मुसा याला मारला गेला. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. विशेषतः मागील तीन वर्षांत लष्करी जवान आणि नागरी वस्त्यांना त्याने लक्ष्य बनविले होते. २०२३ मधील पीर पंजाल परिसरातील हल्ला आणि २०२५ मधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये त्याचा सहभाग होता. पहलगाममधील हल्ल्यात २६ पर्यटकांना प्राण गमवावे लागले होते. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन हत्याकांड केले होते. त्यानंतर, देशभर संतापाची लाट उसळली होती. भारतीय लष्कराने व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील लष्करी अड्डे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत उद्ध्वस्त केले होते. 
 
मुसा हा फौजी आणि सुलेमान शाह या नावाने ओळखला जात होता. त्याने २०२१ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. तो ’लष्कर-ए-तैयबा’चा मुख्य ’ऑपरेशन्स कमांडर’ म्हणून कार्यरत होता. 
 
मुसा पाकिस्तानी सैन्यात २३ वर्षे कार्यरत होता. त्यातील १८ वर्षे त्याने एसएसजीमध्ये सेवा बजावली होती. २००६ ते २००८ या काळात त्याला पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या सुरक्षा पथकात नियुक्त करण्यात आले होते. त्याने अमेरिकेत सुरक्षेचे विशेष प्रशिक्षण घेतले होते. 
 
तसेच, वैद्यकीय अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर तो दहशतवादी कारवायांशी जोडला गेला. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्याची निवड दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आली होती. लष्कर-ए-तैयबाचे नेतृत्व करण्यासाठी त्याला जम्मू-काश्मीरमध्ये घुसवण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात बडगाम, उधमपूर आणि डोडा जिल्ह्यांत सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली. महिन्याभरात सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
 

Related Articles