दि रोझ सोसायटीतर्फे गुलाबपुष्प प्रदर्शन   

पुणे : दि रोझ सोसायटी ऑफ पुणेतर्फे ११३ व्या गुलाबपुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी टिळक स्मारक मंदिरात गुलाब प्रेमींसाठी खुले असणार आहे. हे प्रदर्शन दि रोझ सोसायटीचे माजी अध्यक्ष दिवंगत रामराव जगताप यांना समर्पित करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश शिर्के यांनी दिली. 
 
प्रदर्शनाचे उद्घाटन ३ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता विदर्भ रोझ सोसायटीचे अध्यक्ष रमेशसिंग ठाकूर यांच्या हस्ते होईल. यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक उपस्थित राहणार आहेत. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता तुकाई एक्झोटीकचे संचालक संग्राम जगताप यांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले जाणार आहे. गुलाबपुष्प क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या एका व्यक्तीला दरवर्षी पावसाळी गुलाब प्रदर्शनात ’विजय पोकर्णा सन्मान सुवर्णपदक’ देऊन गौरविण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार बंगाल रोझ सोसायटीचे सचिव संजोय मुखर्जी यांना देण्यात येणार आहे.
 
१९६२ मध्ये स्थापन झालेली दि रोझ सोसायटी ही देशातील पहिली शहरी गुलाब संस्था आहे. प्रदर्शनात पुष्परचना व फुलांसह ७६ विभागांचा समावेश असणार आहे.  प्रत्येक विभागात प्रथम व द्वितीय अशी दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच ३७ चषकांचा समावेश असणार आहे. प्रदर्शनाच्या जागी स्टॉलवर गुलाब व इतर रोपे, खते, कीटकनाशके आणि बाग कामाची अवजारे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. नागरिकांसाठी हे प्रदर्शन ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते रात्री ८.३० आणि ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ८.३० पर्यंत विनामूल्य खुले असेल, असेही गणेश शिर्के, कार्याध्यक्ष अनुपमा बर्वे, कार्यवाह नीलेश आपटे यांनी सांगितले.

Related Articles