पाषाण चौकातील कोंडी फोडण्यासाठी तीन रस्त्यांचा पर्याय   

डीआरडीओच्या जागेची संमती घेऊन रुंदीकरणासह ग्रेड सेपरेटरची मागणी

पुणे : पाषाण गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी-संध्याकाळी दररोज सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी चौकाचे रुंदीकरण, ग्रेड सेपरेटर आणि वाहतूक बेट उभारण्याबरोबरच निम्हणमळामार्गे सोमेश्वरवाडीला जोडणारा पर्यायी रस्ता विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेविका मयुरी कोकाटे आणि नगरसेविका रत्नमाला सातव यांनी स्थायी समितीला पत्र दिले आहे.पाषाण चौकातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर १८ सप्टेंबर रोजी प्रकल्प प्रमुख दिनकर गोजारे, पथ विभाग प्रमुख राजेश बनकर आणि अधीक्षक अभियंता रमेश वाघमारे यांच्यासह संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीत चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने काही उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले.
 
पाषाण चौकाच्या वाहतूक नियोजनासाठी डीआरडीओच्या जागेची संमती घेऊन ग्रेड सेपरेटर उभारावा, चौकाचे रुंदीकरण करावे आणि वाहतूक बेट विकसित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी संरक्षण विभागाच्या हद्दीलगत निम्हणमळामार्गे सोमेश्वरवाडीला जोडणारा पर्यायी रस्ता विकसित करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे. त्याचबरोबर निम्हणमळा ते सुस रोडला जोडणारा २४ मीटर रुंदीचा प्रस्तावित डीपी रस्ता आणि राम नदीवरील पुलाचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्यास पाषाण चौकावरील वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होऊ शकते. या कामांसाठी डीआरडीओ तसेच संरक्षण विभागाच्या आवश्यक जमिनीच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. संबंधित विभागांसोबत महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.निम्हणमळा परिसरातील बाधित नागरिकांना विश्वासात घेऊन योग्य मोबदला देत रस्ता विकसनाची प्रक्रिया सुरू करावी. तसेच प्रस्तावित कामांसाठी २०२६-२७च्या महापालिका अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करावी, अशी मागणीही कोकाटे आणि सातव यांनी केली आहे.

Related Articles