अकाली दलाचे नेते मजीठिया यांना समन्स   

चंडीगढ : सहा हजार कोटींच्या अमली पदार्थ प्रकरणात पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अकाली दलाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बिक्रम सिंग मजीठिया यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार, मजीठिया यांना ५ ऑक्टोबर रोजी एसआयटीच्या चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.
 
याच प्रकरणात एसआयटीने बडतर्फ पोलिस अधिकारी जगदीश भोला यांनादेखील समन्स बजावले आहे. त्यांनादेखील ५ ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे एसआयटी मजीठिया आणि भोला यांची आमने-सामने बसवून पहिल्यांदाच चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी कुस्तीपटू असलेल्या भोला यांना पंजाब पोलिसांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये अमली पदार्थ रॅकेटच्या संदर्भात अटक केली होती. २०१४ मध्ये भोला यांनी मजीठिया यांचे नाव घेतले होते. मात्र, मजीठिया यांनी आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) तपास सुरू केला होता. 

Related Articles