जिल्हात‘मॉडेल पीएचसी’चा विस्तार; ग्रामीण आरोग्य सेवा होणार आधुनिक   

रुग्णांसाठी डिजिटल नोंदी, आधुनिक प्रसूती कक्ष आणि तज्ज्ञांचा सल्ला

पुणे : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आता अत्याधुनिक होणार आहेत. आधुनिक उपचार सुविधांसोबत रुग्णांच्या माहितीचे डिजिटल व्यवस्थापन, राष्ट्रीय गुणवत्ता मानके आणि दूरस्थ तज्ज्ञ सल्ला यांची सांगड घालणार्‍या ‘पुणे मॉडेल पीएचसी प्रकल्पा’तून ग्रामीण आरोग्यसेवेचे स्वरूप बदलण्यावर भर देण्यात येत आहे.या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ११० प्राथमिक आरोग्य केंद्रांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येत आहे. त्यापैकी ५५ केंद्रांचे मागील वर्षी मॉडेल पीएचसीमध्ये रूपांतर करण्यात आले असून, उर्वरित केंद्रे यावर्षी विकसित करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समिती, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जिल्हा परिषद सेस निधीचा वापर करण्यात येत आहे. फर्निचर, उपकरणे आणि आवश्यक सुविधांसाठी सेस निधीची पूरक जोड दिली जात आहे. याशिवाय सीएसआर निधीतून वैद्यकीय उपकरणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांच्या सौर विद्युतीकरणासाठी सहकार्य घेतले जात आहे.
 
रुग्णांच्या सोयीला केंद्रस्थानी ठेवून बदल
 
प्रकल्पाचा भर केवळ इमारतींचे नूतनीकरण करण्यावर नाही. केंद्रात येणार्‍या रुग्णांना स्वच्छ, सुरक्षित आणि अधिक सोयीचे वातावरण मिळावे, यासाठी मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष, आधुनिक प्रसूती कक्ष, अद्ययावत फर्निचर, प्रशस्त प्रतीक्षा कक्ष आणि सुधारित कॉरिडॉर्स यांचा समावेश करण्यात येत आहे. उपचार सुविधांसह रुग्णांच्या केंद्रातील वावराचाही विचार या विकासात करण्यात आला आहे.
 
आरोग्यसेवेच्या व्यवस्थापनातही डिजिटल बदल आणण्यात येत आहेत. रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून रुग्णांची माहिती आणि केंद्रातील विविध सेवा व प्रक्रियांचे डिजिटल व्यवस्थापन केले जाणार आहे. माहितीचे संकलन आणि सेवा वितरण अधिक कार्यक्षम करणे हा त्यामागील उद्देश आहे. ग्रामीण नागरिकांना घराजवळ दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पायाभूत सुविधांबरोबर डिजिटल व्यवस्थापन आणि गुणवत्ता मानकांना दिलेले स्थान हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरत आहे.
 
दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसिन सुविधा
 
डोंगराळ आणि दुर्गम भागांतील रुग्णांना स्थानिक पातळीवर तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसिन सुविधा सुरू करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार रुग्णांना या सुविधेद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांशी दूरस्थ सल्लामसलत करता येणार आहे. तसेच सुविधांच्या विस्ताराबरोबरच सेवांच्या गुणवत्तेलाही प्राधान्य देण्यात येत आहे. रुग्ण सुरक्षा, स्वच्छता, सेवा प्रक्रिया आणि गुणवत्ता व्यवस्थापनासाठी निर्धारित मानकांच्या अंमलबजावणीवर भर दिला जात आहे.

Related Articles