कौटुंबिक वादातही मुलाचे वडील, आजी-आजोबांशी नाते अबाधित   

आठवड्यातून तीन दिवस मुक्कामाची परवानगी 
 
पुणे : कौटुंबिक वादातून पती-पत्नी वेगळे राहत असले, तरी त्याची झळ मुलाच्या वडिलांशी तसेच आजी-आजोबांशी असलेल्या नात्याला बसू नये, यावर कौटुंबिक न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. साडेचार वर्षांच्या मुलाला प्रत्येक आठवड्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस वडील आणि आजी-आजोबांसोबत मुक्काम करण्याची परवानगी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दीप्ती डी. पाटील यांनी दिली.
 
संबंधित दाम्पत्य गेल्या दीड वर्षापासून वेगळे राहात आहे. सुरुवातीला मुलगा नियमितपणे आठवड्यातील तीन दिवस वडील आणि आजी-आजोबांसोबत राहात होता. मात्र, कौटुंबिक वादाचे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यानंतर मुलाचा वडील आणि आजी-आजोबांशी होणारा सहवास थांबविण्यात आला. मुलाला पुन्हा वडील आणि आजी-आजोबांचा सहवास मिळावा, यासाठी वकील राणी ढाकणे आणि वकील विजयकुमार ढाकणे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज करण्यात आला. मात्र, मुलाच्या आईने या मागणीला विरोध केला. 
 
मुलाचे आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करताना मुलाला वडील आणि आजी-आजोबांकडे मुक्कामी पाठविण्यास हरकत घेण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मुलाचे वय, शाळेचे वेळापत्रक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याचे हित यांचा विचार केला. वडिलांकडे मुक्काम केल्यामुळे मुलाच्या हिताला बाधा पोहोचेल, असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.
 
ताबा आणि भेटीचा अधिकार वेगळा
 
यापूर्वी मुलाच्या ताब्यासाठी करण्यात आलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. मात्र, ताब्याचा अर्ज फेटाळण्यात आला म्हणून मुलाला वडिलांना भेटण्याचा किंवा त्यांच्यासोबत वेळ घालविण्याचा अधिकार संपत नाही, अशी महत्त्वपूर्ण भूमिका न्यायालयाने घेतली. मुलाचा ताबा आणि भेटण्याचा अधिकार या दोन स्वतंत्र बाबी आहेत. त्यामुळे ताब्याच्या अर्जाचा निकाल काहीही असला, तरी मुलाच्या भेटीच्या मागणीचा स्वतंत्रपणे विचार करण्यास कायदेशीर अडथळा नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Related Articles