पावसाअभावी आंबेगावातील भातशेती धोक्यात   

मंचर, (वार्ताहर) : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागात गेल्या पंचवीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भातशेती धोक्यात आली आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी भात पिके करपू लागल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, आदिवासी शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी आदिवासी शेतकर्‍यांनी केली आहे.
 
तालुक्यातील ३५ गावांतील भातशेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कोंढवळ परिसरात दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली असली, तरी इतर डोंगरी भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. भात हे आदिवासी शेतकर्‍यांचे पावसाळ्यातील प्रमुख व अनेक कुटुंबांचे एकमेव पीक असल्याने पिकाचे नुकसान झाल्यास त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जनाबाई उगले यांनी सांगितले. पावसाअभावी भात पिकांची पाने व रोपे सुकू लागली असून, काही ठिकाणी पिके करपण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन भात पिकांची पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.
 
भात हेच आमचे मुख्य पीक आहे. पाऊस नसल्याने भाताची रोपे सुकत आहेत. पिकाचे नुकसान झाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण होईल. शासनाने तातडीने पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी.
 
- जनाबाई उगले, शेतकरी उगलेवाडी.
 

Related Articles