खरिपाला परतीच्या पावसाची प्रतीक्षा   

भोरमध्ये ४० टक्के उत्पादन घटण्याचा धोका?

पुरूषोत्तम मुसळे

भाताचे आगार समजले जाणार्‍या भोर तालुक्यातील खरीप हंगामातील भातासह इतर पिके सध्या परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत जोरदार पाऊस पडला नाही, दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. त्यामुळे  सुमारे ४० ते ४५ टक्के भातासह इतर पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोयाबीनच्यादेखील नुकसानीची भीती व्यक्त होत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकरी चरितार्थ व काही प्रमाणांत आर्थिक हातभाराचे साधन म्हणून प्रामुख्याने भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणांवर घेतात. त्या खालोखाल नाचणी करतात. दोन्ही पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तर पूर्व भागात विहीर व सिंचनाची सोय असल्यामुळे सोयाबीन व भुईमूग जास्त करतात. त्या खालोखाल कडधान्य, तेलबिया, भाजीपाला घेतात. 
 
सप्टेंबर अखेर फुलोर्‍याची अवस्था संपून ओंब्यात दाणे भरणे, निसवणे अशी भाताची प्रगती होते. त्यासाठी मोठ्या खाचरात पाणी साठून राहील  अशा दमदार पावसाची गरज असते. यावर्षी तालुक्यातील नऊ मंडळामध्ये सरासरी १ हजार २०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक निगुडघर मंडळात १ हजार ६६७ तर सर्वांत कमी नसरापूर ५८८ मिलीमीटर पाऊस झाला. मात्र २२ सप्टेंबरपासून पावसाने दडी मारली मारली आहे. तर दुसरीकडे कडक ऊन पडत आहे. त्यामुळे भातखाचरे कोरडी पडली असून, अनेक ठिकाणी शेतात भेगा पडल्याचे आढळते. काही ठिकाणी रोपे पिवळी पडू लागली आहेत. पाऊस नसेल तर ओंब्यातील दाणे चांगले भरत नाहीत. पळंज  वाढून उत्पादनात  मोठी घट होते. सध्या शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. तर विहीर, कालवा, नदीकाठ, धरण आदी परिसरातील शेतकरी पाणी देऊन पीक वाचवण्यासाठी धडपडत आहेत. धोंडीबा तान्हू मालुसरे, जिजाबा गमपत  पारठे, अशोक यशवंत पारठे, संतोष नारायण वेणुपुरे, नारायण ठकू येणुपुरे आदींनी या वर्षी भाताच्या उत्पादनात मोठी घट होईल, असे सांगितले. तर शेतपिकांचे पंचनामे सुरू केले आहेत. त्यानंतर  पीक उत्पादनातील घट किती होईल याचा  अंदाज  कळेल असे तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी सांगितले.
 
खरिपाचे एकूण २० हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यामध्ये भात ७ हजार ६००, ज्वारी १००, बाजरी २००, रागी १५००, वरई ८००, तृणधान्य ७००,तूर २००, मूग ५०, उडीद १००, इतर कडधान्ये ६५०, भूईमूग ४ हजार, तीळ १००, कारळा १००, ऊस ५०, भाजीपाला ८०० हेक्टर आणि सोयाबीन ३ हजार हेक्टरचा समावेश आहे. 

धरणाचे पाणी पूर्वेकडे

निरा खोर्‍यातील भाटघर, निरा देवघर, वीर, गुंजवणी धरणात ४३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा होतो. परंतु पुणे जिल्ह्यातील  पूर्वेकडील तालुक्यातील ३७ हजार ७० हेक्टर तर उजव्या कालव्यावर सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार ५०६ हेक्टर असे क्षेत्र नीरा प्रणालीच्या पाण्यावर भिजते. त्यामध्ये भोर  तालुक्यातील अतिशय कमी क्षेत्र पाण्याखाली आहे. 

जलयुक्त, जलसंधारणाचा बोजवारा

कृषी, वन व पंचायत समिती मार्फत सन २००५ ते २०१५ या काळात जलसंधारण, जलयुक्त शिवारमध्ये माती नाला व सिमेंट, वळण बंधारे, कोल्हापूर बंधारे, वनतळी, शेततळी, नाला खोलीकरण, शिवकालीन टाकी, समतल सलग चर आदी योजनांची ८० ते ९० कोटी रुपयांची हजारो कामे तालुक्याच्या ग्रामीण भागात झाली. त्यामध्ये किती पाणी साठले, किती कामे सुस्थितीत आहेत याची माहिती कोणाकडे उपलब्ध नाही. मात्र त्यामध्ये संबंधित ठेकेदार, अधिकारी, कर्मचार्‍यांचे उखळ पांढरे झाल्याचा आरोप स्थानिक करतात.
 

Related Articles