जिल्हा परिषद कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न   

सांगली : जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील एका कर्मचार्‍याने बुधवारी सायंकाळी मुख्यालयातील तिसर्‍या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. दरम्यान, गंभीर प्रकार घडून सुद्धा संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ केली. हे प्रकरण रात्री उशिरापर्यंत संबंधित कर्मचार्‍यास घेऊन अधिकार्‍यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला.
 
जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात संबंधित कर्मचारी मागील काही वर्षांपासून लिपिक पदावर कार्यरत आहे. या कर्मचार्‍याची नुकतीच दुसर्‍या विभागात बदली झाली आहे, मात्र, संबंधित विभागाच्या प्रमुखांनी त्यांना तेथून कार्यमुक्त केलेले नाही. यावरून हा कर्मचारी मागील काही दिवसांपासून तणावाखाली होता. कार्यमुक्त करण्याबाबत वारंवार विचारणा करूनही सोडले जात नसल्याने या कर्मचार्‍याने बुधवारी सायंकाळी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.सायंकाळी सहाच्या सुमारास संबंधित कर्मचारी मुख्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावर गेला. तेथून तो उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना इतर विभागातील कर्मचार्‍यांनी आत्महत्या करण्यापासून रोखले. या प्रकारानंतर जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. 
 
संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी धाव घेत कर्मचार्‍यास अर्थ विभागाच्या केबिनमध्ये आणून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत संबंधित कर्मचार्‍याला समजावून सांगण्यात येत होते.

संबंधित अधिकार्‍यावर कारवाईची संघटनेची मागणी 

संबंधित कर्मचार्‍याच्या कौटुंबिक अडचणी असतानाही त्याचा विचारही केला गेला नाही. या प्रकाराने अर्थ विभागातील बेफिकीर कारभाराबाबत कर्मचार्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. या प्रकारास जबाबदार अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे कर्मचारी संघटनांच्यावतीने सांगण्यात आले.
 

Related Articles