कोकण, मध्य महाराष्ट्रात आज मेघगर्जनेसह पाऊस   

पुणे : पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील बहुतांश, तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार आहे. तसेच घाट माथ्यावरही जोरदार पावसाचा इशारा देण्यात हवामान विभागाने दिला आहे. 
 
पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये १.५ ते ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वार्‍यांची स्थिती कायम आहे. तर दक्षिण तेलंगणापासून आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनार्‍यालगत असलेली चक्राकार वार्‍यांची स्थिती ते मन्नारच्या आखातापर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असताना, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
 
यंदा देशासह महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. राज्यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक ३९ टक्के आणि विदर्भात २६ टक्के पावसाची घट झाली आहे. राज्याच्या मध्य आणि आतील भागात पावसाची मोठी तूट कायम आहे. विशेषतः मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या मोठ्या भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले आहे. त्यामुळे या भागातील पिकांवर परिणाम झाला आहे.
 
उत्तर आणि मध्य भारतातील अनेक भागातून पाऊस माघारी फिरला. दरम्यान, सध्या राज्यातील काही भागात वादळी पावसाची नोंद होत असून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली. संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी पावसाचे प्रमाण कमीच राहिले, त्यामुळे निम्म्याहून अधिक राज्यात पावसाची मोठी तूट कायम आहे. दरम्यान, मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असून पुढील काही दिवसात महाराष्ट्रातूनही पाऊस माघारी फिरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीय वार्‍यांची स्थिती आहे.
 
मराठवाड्यातील अंतगर्त भागातही पावसाची शक्यता आहे. हवामान प्रणाली सक्रिय राहिल्यास परतीच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक भागात सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कमाल तपमान २ ते ३ अंशाने वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

पाच दिवसांत परतीचा पाऊस

पुढील चार ते पाच दिवसांत परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. याच चार ते पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी परतीचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात अत्याल्प पावसाची नोंद झाली आहे. त्यातील काही भागात परतीचा पाऊस कोसळल्यास त्या भागाला मोठा दिलासा मिळणार आहे.
 

Related Articles