भरधाव टँकरची दुचाकीला धडक; तरूणाचा मृत्यू   

पुणे : लोणी काळभोर परिसरातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत भरधाव टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळी न थांबता पलायन केल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
 
अनयकुमार उदयकुमार चौधरी (वय २१, रा. शेवाळवाडी, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र अनय मंगेश कामदेव (वय २१, रा. शेवाळवाडी) हा गंभीर जखमी झाला आहे. २८ सप्टेंबर रोजी अनय कामदेव आणि अनयकुमार चौधरी हे दोघे दुचाकीवरून सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या लेनमधून जात होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव टँकर चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अनयकुमार याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अनय कामदेव हा गंभीर जखमी झाला.
 
अपघातानंतर टँकर चालकाने जखमींना मदत करण्याऐवजी तसेच पोलिसांना घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.

Related Articles