खुनाच्या कारस्थानापासून दु:खाचा अभिनय करण्यापर्यंत अभ्यास   

आरोपींची डिजिटल शोधमोहीम पोलिसांच्या हाती 

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांडाचा कट केवळ प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करूनच रचण्यात आला नव्हता, तर आरोपींनी यापूर्वी घडलेल्या हत्याकांडांचा, लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या मृत्यूंचा तसेच गुन्ह्यानंतर पोलिसांच्या तपासापासून बचाव करण्याच्या पद्धतींचाही ऑनलाइन अभ्यास केल्याचे पोलिस तपासातून समोर आल्याचा दावा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. 
 
केतनच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांसमोर दुःख कसे व्यक्त करायचे आणि अधिक दुःखी कसे दिसायचे, याबाबत सिया गोयल हिने ऑनलाइन माहिती शोधल्याचे डिजिटल पुराव्यांच्या तपासातून निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. १८ जून रोजी केतनला लोहगड किल्ल्याच्या परिसरात नेण्यात आले आणि त्याला दरीत ढकलण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर केतनचे कुटुंबीय लोहगडच्या पायथ्याशी पोहोचले. त्यावेळी सियाने व्यक्त केलेल्या भावनांबाबत कुटुंबीयांच्या मनात संशय निर्माण झाल्याचे तपासात नमूद आहे. त्यानंतर घरी परतल्यानंतर सियाने दुःख कसे व्यक्त करावे, अधिक दुःखी कसे दिसावे, यासंदर्भात ऑनलाइन शोध घेतल्याचे पोलिसांनी डिजिटल पुराव्यांच्या आधारे म्हटले आहे.
 
राजा रघुवंशी हत्याकांडाचा घेतला ‘केस स्टडी’
 
खुनाचा कट रचण्याच्या प्रक्रियेत आरोपींनी चर्चेत असलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाचा अभ्यास केल्याचे पोलिस तपासात आढळल्याचा दावा आहे. या प्रकरणात हत्या नेमकी कशी घडली, तपास यंत्रणेला कोणते धागेदोरे मिळाले आणि आरोपींकडून कोणत्या चुका झाल्या, याबाबतची माहिती आरोपींनी शोधल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
 
यानंतर लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या मृत्यूंची माहितीही आरोपींनी शोधल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. टायगर पॉइंट तसेच लोहगड परिसरात यापूर्वी घडलेल्या अशाच घटनांचा शोध घेण्यात आला. मानसी गोविंदपूरकर या तरुणीच्या पडून झालेल्या मृत्यूच्या घटनेची माहितीही आरोपींनी शोधल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे. सिया, चेतन आणि रितेश हंगे यांच्यामध्ये ही माहिती समाज माध्यम आणि मेसेजिंग अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
 
इंस्टाग्राम-व्हॉट्सअ‍ॅपपासून स्नॅपचॅटपर्यंत डिजिटल पुरावे
 
या प्रकरणाच्या तपासात डिजिटल पुराव्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आरोपींच्या इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि स्नॅपचॅटवरील संभाषणांचा, एकमेकांना पाठविलेल्या माहितीचा तसेच विविध डिजिटल उपकरणांमधील डेटाचा तपास करण्यात आला. डिजिटल पुरावे जप्त करून ते दोषारोपपत्रासोबत न्यायालयात सादर केल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे. त्यामुळे केतनच्या हत्येपूर्वी आरोपींमध्ये झालेल्या चर्चेपासून ते घटनेनंतरच्या हालचालींपर्यंत डिजिटल माध्यमातून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
 
केतनच्या मृत्यूनंतर सुरुवातीच्या काळात आरोपींना आपण आखलेल्या कटामुळे पोलिसांच्या हाती लागणार नाही, असा विश्वास असल्याचे तपासातून समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, कालांतराने चेतन चौधरीला गुन्हा उघडकीस येण्याची आणि पोलिसांकडून पकडले जाण्याची भीती वाटू लागली. त्यावेळी सियाने चेतनला धीर दिल्याचे तपासात नमूद आहे. त्यानंतर सियाचाही आत्मविश्वास डळमळू लागल्यावर चेतनने तिला आधार दिल्याचे पोलिसांनी दोषारोपपत्रात म्हटले आहे.
 
चौकशीत काय बोलायचे? ऑनलाइन शोध
 
रितेश हंगेच्या सल्ल्याने पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतर कसे वागायचे, चौकशीदरम्यान कोणत्या प्रकारे उत्तरे द्यायची आणि परिस्थितीत घाबरून न जाता कसे वागायचे, याबाबतही ऑनलाइन शोध घेण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. अटकेनंतर आरोपी तुलनेने शांत आणि आत्मविश्वासपूर्ण असल्याचे दिसून आले. मात्र, या वर्तनाचा आणि ऑनलाइन शोधचा गुन्ह्याशी नेमका संबंध कितपत आहे, हे न्यायालयीन सुनावणीदरम्यान पुराव्यांच्या आधारे स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

Related Articles