E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
मध्यवर्ती पुणे आणि अशांतता!
Samruddhi Dhayagude
01 Oct 2026
समस्याग्रस्त पुणे : सुरेश कोडीतकर
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात जे लोक राहात आहेत त्यांचे जगणे आणि वावरणे आता अत्यंत मर्यादित झाले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सर्व प्रकारच्या
बाजारपेठेचा हा मध्यवर्ती भाग असल्याने सातत्याने येथे शहर आणि ग्रामीण पुण्यातील, पुण्याबाहेरील लोकांचा, माल आणि प्रवासी वाहनांचा राबता असतो. मुळात रस्त्यांची रुंदी मर्यादित असल्याने, वाहने ठेवण्याच्या पुरेशी सुलभ सोयी नसल्याने, तसेच लोकांमध्ये सार्वजनिक शिस्तीचा अभाव असल्याने गावठाण पुण्यातील नागरिकांचे जगणे दुष्कर झाले आहे. कामासाठी बाहेर पडणे आणि संध्याकाळी घरी परतणे हे या लोकांसाठी एक मोठे दिव्य झाले आहे. प्रचंड वाहने, वाहन कोंडी, गर्दीचा पूर, स्वच्छतेचा अभाव, वाहनांचे आणि हॉर्नचे आवाज, धूर, धूळ आणि कोंडलेली हवा आणि घुसमटणारे श्वास हे सर्व भोग मध्यभागातील पुणेकरांच्या वाट्याला आले आहेत. येथून सुटका करून घेता येत नाही आणि कुटुंबकबिला हलवता येत नाही ही या लोकांची व्यथा आहे. अशा या लोकांच्या हालात भर दहीहंडीपासून सुरू होणार्या आणि थेट दिवाळीपर्यंत असणार्या सणांमुळे गर्दी, देवदर्शन, मंडप, मिरवणूक, देखावे, गर्दी, खरेदी, खानपान यामुळे पडते. आणि मध्यभागातील पुणेकर यापासून दूर जाण्याचा मार्ग पत्करतात.
लोकसंख्येची घनता
एकांत, खासगीपण, पुरेसा मोकळेपणा, स्वायत्तता हे जणू मध्यवर्ती पुण्यातील लोकांना लागू होत का ? कमी जागा उपलब्धता आणि माणसांची दाटी यामुळे मध्यवर्ती पुण्यात लोकसंख्येची घनता जास्त आहे. शिवाय सणसुद आणि इतर महत्त्वाच्या काळातील गर्दीमुळे मध्यवर्ती पुणेकरांच्या जगण्यावर अतिक्रमण होते. मध्यवर्ती भागात कुठून कुठेही गेले तरी वाहने, गर्दी, चौक, बोळांमधील दाटी, कोंडी, वेळापव्यय, श्वसनात येणारे धोकादायक वायू हे सारे आपसूक समोर येते. घोरपडे पेठ ते खडकमाळ आळी, शुक्रवार पेठ ते टिळक रस्ता मार्गे अलका चौक, भवानी पेठ ते थेट मालधक्का चौक, जुना बाजार ते डेक्कन, या परिघात सप्ताहातील सर्व वार निहाय पेठा, कसबा, सदाशिव, नारायण आणि नवी पेठ, पुलाची वाडी, नदीकाठ या सर्वांचा समावेश होतो. आता या सर्व भागात विविध व्यापारी ठिकाणे, मंडई, शाळा, महाविद्यालये, देवस्थाने, जुने वाडे, बागा, ऐतिहासिक स्थाने, मानाच्या आणि श्रद्धेच्या गणेशाची मंदिरे आहेत. त्यामुळे या भागाकडे दिवसभर आणि सणासुदीच्या काळात कैकपटीने लोकांचा ओढा आणि वर्दळ जास्त असते. या कारणास्तव दुकान आणि मकान यात तिथे विविध कामांसाठी येणारे सामान्य अभ्यागत आणि तिथे राहणे प्राक्तनात असलेले पुणेकर भरडून निघतात. नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू व्हायच्या सुमारास होणारी खरेदीची गर्दी, दहीहंडी, गणेशोत्सवातील दहा दिवस, नवरात्र, दसरा/दिवाळीची खरेदी यामुळे भरडून निघण्यावर कडी होते. आणि लोक जीव मुठीत धरून या काळात जगतात. दहीहंडी, गणेशोत्सव, मिरवणुका, निवडणूक प्रचार वगैरे काळात डीजे, ध्वनीवर्धक, ढोलताशा वादन यामुळे मध्यवर्ती भागातील लोकांची शांतता भंग पावते. ज्यांना शक्य आहे ते स्थलांतर करतात. मालक, नागरिक आणि मतदार असलेल्या लोकांवर अशी वेळ का येते?
ध्वनी प्रदूषण मर्यादेबाहेर !
पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सव सांगता विसर्जन मिरवणूक यंदा ३४ तास चालली. ढोलताशा पथकांच्या आणि त्यातील वादकांच्या संख्येवर बंधन नसल्याने लक्ष्मी रस्त्यावर पुढे जाण्याचा वेग मंदावला होता आणि मिरवणूक रेंगाळली होती. पथकाचा एकत्रित आवाज निर्धारित डेसिबल मर्यादेपेक्षा अधिक होणार नाही याची काळजी घेणारे कोणी नव्हते. २५ आणि २६ सप्टेंबर रोजी विविध ठिकाणी ठराविक वेळेला ध्वनी पातळी मोजण्यात आली होती. बेलबाग, गणपती चौक, कुंटे चौक, गोखले चौक, टिळक चौक, खंडोजीबाबा चौक इत्यादी ठिकाणी दु १२, दु ४, सायं. ८, रात्री १२, पहाटे ४, सकाळी ८ अशा वेळी ध्वनीचे मापन करण्यात आले. या सर्व ठिकाणी नोंदवलेल्या ध्वनी पातळीची सरासरी काढली असता ९८.७, ११३.४, १११.९, ११२.६, १०५.१, ८५.२, आणि १०४.५ इतकी होते. एकुणात सरासरी ही १०४.५ डेसिबल असल्याचे स्पष्ट होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबल, रात्री १० ते सकाळी ६ या काळात ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५, रात्री ५५, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ आणि रात्री ४५, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबल ध्वनीपातळी असणे अपेक्षित आहे. असे असताना उपरोक्त सरासरी ही व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रासाठी निर्धारित मानकापेक्षा दुपटीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.
उत्सव, सुधारणा, विधायकता
सण साजरे करण्याला कोणाचा विरोध नाही. सण आणि उत्साह, आनंद, प्रसाद हे सारे आपल्या सर्वांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. गणेशोत्सव पुण्याचा मानबिंदू आहे. पुण्यातील गणेशोत्सवाला विविध देखाव्यांतून सामाजिक प्रबोधन आणि जाणीव जागृतीची परंपरा आहे. पण सणांच्या सार्वजनिकतेमुळे सर्व सामान्यांना धडकी भरता कामा नये. आसपास राहणार्या लोकांचे जगणे, श्वास घेणे खडतर होता कामा नये. वाहतुकीचा खोळंबा, नागरिकांचा कोंडमारा, रस्ते आणि बाजारपेठा बंद, पोलिस आणि महापालिकेवर ताण, परिवहन यंत्रणांचे अहोरात्र राबणे हे सारे तणावाखाली घडत राहाते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे हे अनेक वर्षे सुरू आहे. यात बदलाची आणि विधायकतेची मागणी सातत्याने होत आहे. पुण्यात यापूर्वी थर्माकोल बंदी, शाडूच्या मूर्तींना प्राधान्य, निर्माल्य आणि मूर्ती विसर्जन नदीपात्रात न करणे, मूर्ती दान, मूर्तींचे हौदात विसर्जन, रात्री ध्वनिक्षेपक बंद ठेवणे, स्पीकरच्या भिंती टाळणे, सामाजिक कार्यात सहभाग वाढवणे हे सकारात्मक बदल घडलेले आहेत. डीजेचा वापर टाळणे, चार बेस आणि चार टॉप ही मर्यादा पाळण्याची सुरुवात यंदा झाली आहे. प्रेशर मीड, प्लाझ्माच्या वापरावर पूर्ण बंदी हे पाळले जात आहे. आता ढोल ताशा पथकांच्या आणि त्यातील वादकांच्या संख्येवर मर्यादा हे सुद्धा व्हायला हवे.
सोलापुरात आणि नागपुरात डीजे बंदी यशस्वी होऊ शकते तर पुण्यात का नाही ? स्वातंत्र्य लढ्यापासून सामाजिक बदलांच्या अनेक चळवळींना पुण्यातून सुरुवात झाली आहे. यंदाची विसर्जन मिरवणूक ही हरित रथ, नशामुक्त भारताचा संदेश, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची प्रतिकृती, चिमुकल्यांना खेळणी वाटप, ऐतिहासिक जिवंत देखावा यामुळे संस्मरणीय ठरली आहे. म्हणजेच मांगल्य, विधायकता, जागल्या, प्रबोधन, जागर यासाठी पुणेकर तत्पर आहेत हे यातून दिसून येते आहे. डीजेला विरोध म्हणजे गणरायाला विरोध नाही. ध्वनिक्षेपक विरोधी मंच म्हणजे उत्सवाला विरोध नाही. उलट हे सर्व गणेशोत्सवाला विविध प्रदूषणमुक्तीच्या दिशेने नेणारे आहे. हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे.
शहाणपण महत्त्वाचे
गणेशोत्सव वा कोणताही प्रसंग हा उन्माद, खेळ, मस्ती, मौजमजा यासाठी नाही. उत्सव हे धर्म, परंपरा, संस्कृती जतन आणि भक्ती यासाठीचे एक साधन आहे. त्यात शुचिता, सभ्यता, विधायकता असायला हवी. याबाबत गणेश मंडळे, धार्मिक संस्था, राजकीय गट, विविध विश्वस्त संस्था यांनी एकत्र येऊन कृती करायला हवी. गणेशोत्सवातील प्रदूषणमुक्तीसाठी शांततामय नागरी आंदोलन होत आहेत. सर्व प्रकारच्या प्रदूषणाला आळा बसण्यास सुरुवात झाली तर हे सामाजिक आणि पर्यावरणीय सुधारणांचे एकत्रित पुढे पडलेले पाऊल म्हणता येईल. गणेशोत्सव हा समाजाला आपला वाटला पाहिजे यासाठी लोकांच्या जगण्यातील वावरण्यातील सुसह्यता हे सुद्धा सांभाळले गेले पाहिजे. सर्व मंडळांनी, संस्थांनी, विश्वस्त सभेने सामंजस्य दाखवणे अपेक्षित आहे. उत्सव आपला आहे म्हटल्यावर समाजाला त्रास होऊ न देण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे. ती टाळणे वा समाजाला वेठीस धरणे हे अयोग्य आहे.
गणरायाची आराधना करत असताना बुद्धी, विवेक, शहाणपण, तारतम्य उपयोगात आणणे घडायला हवे. तरच गणरायाची पूजा सार्थकी लागणार आहे. रस्ते अडवलेले, मार्ग बंद केलेले, लोकांचे हाल, ध्वनींची तीव्र पातळी, गोंगाट, चित्रपटातील गाणी, बीभत्स नृत्य, मांगल्य आणि पावित्र्याला मूठमाती या सांस्कृतिक प्रदूषणाने गणराय कसे प्रसन्न होणार ? मध्यवर्ती पुण्यातील नागरिकांचे हाल आणि पुण्यात बाहेरून येणार्या लोकांचा महापूर, चेंगराचेंगरी, बालकांचे आणि स्त्रियांचे हाल, चोरीच्या घटना यामुळे सणासुदीचा काळ हा सर्वांसाठी धकाधकीचा आणि थकवणुकीचा काळ असतो. स्पर्धा परीक्षांसाठी चालू असलेल्या अभ्यासिका, वसतिगृहे, खोल्या भाड्याने देणे, ग्रंथालये, खाऊ गल्ल्या यामुळे बिगर पुणेकरांची पुण्यात दाटी झालेली आहे. त्यामुळे गर्दीचे वातावरण, हालचाल, घोळके मध्यवर्ती भागात कायम असतात. बाहेरील लोकांना पुण्यातील वातावरणाचे अप्रूप वा आकर्षण असेल पण गावठाणातील लोकांचे जगणे, वावरणे हे नेहमीच धांदलीचे आणि अशांततेचेच असते.
हवी शांतता
मध्यवर्ती पुण्यात बाजारपेठा, दुकानदारी, व्यापार, खानपान, विविध इतर सेवा यांद्वारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे हे मान्य. त्यावर लाखो लोकांची रोजीरोटी आहे हेही मान्य. तरी या सर्व व्यवस्थांमध्ये असलेल्या लोकांना येथील निवासी परिसरात राहणार्या प्रत्येकाला शांततेत जगण्याचा अधिकार आहे. वर्षाचे ३६५ दिवस गावठाण पुण्यातील वा मध्यवर्ती भागातील लोकांच्या जगण्याची कथा त्यांच्या अंगवळणी पडलेली आहे असे नव्हे. तर ती त्यांची हतबलता आणि अनिवार्यता आहे. मध्यवर्ती पुण्यात सणासुदीच्या काळात लोकांची कथा ही व्यथा होते. दुर्दैवाने ती अनेकांच्या कानापर्यंत पोहचतच नाही. सुदैवाने यावेळी सुरुवात झाली आहे. सांस्कृतिक आणि इतर प्रदूषणरहित, असह्य गोंगाट आणि दणदणाट टाळलेला, नशामुक्त आणि पर्यावरणस्नेही असा गणेशोत्सव हे आपणा सर्व पुणेकरांचे स्वप्न आहे. ते आपण साकार करूयात. गावठाण पुण्यातील लोकांचे जगणे होईल तितके सुसह्य करूयात.
Related
Articles
लाज वाटायला हवी तुम्हाला...
11 Oct 2026
देशात अराजकता पसरवण्याचे आंतरराष्ट्रीय कारस्थान
14 Oct 2026
इंडिगोच्या विमानात पॉवर बँकमध्ये आग
12 Oct 2026
जागतिक टपाल दिनानिमित्त पोस्टमन, कर्मचार्यांचा गौरव
11 Oct 2026
इंडिगोच्या विमानावर कोसळली वीज
09 Oct 2026
चार वर्षांत प्रथमच रेपो दरात वाढ
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात