चारजणांच्या कुटुंबासाठी किती आरोग्य विमा?   

वृत्तवेध

गेल्या काही वर्षांमध्ये उपचारांचा खर्च झपाट्याने वाढला आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये तर वैद्यकीय उपचारांचा खर्च आणखी जास्त आहे. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या सदस्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यास मोठा आर्थिक फटका बसू नये, यासाठी किती आरोग्य विमा संरक्षण घ्यावे, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.
 
महागाईच्या काळात चार सदस्यांच्या कुटुंबासाठी पाच लाख रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स पुरेसा आहे का? दहा लाखांचे कव्हर घ्यावे की १५ ते २० लाखांचे संरक्षण अधिक सुरक्षित ठरेल? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, कुटुंबासाठी किती आरोग्य विमा संरक्षण आवश्यक आहे, हे अनेक घटकांवर अवलंबून असते. तुम्ही कोणत्या शहरात राहता, हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे. दिल्ली किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये उपचारांचा खर्च तुलनेने अधिक असल्याने अधिक विमा संरक्षण घेणे आवश्यक ठरू शकते. लहान शहरात राहात असलात, तरी मोठ्या हॉस्पिटल चेनमध्ये उपचार घेण्याची इच्छा असल्यास अधिक विमा कव्हर ठेवणे फायदेशीर ठरते. तसेच कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासात गंभीर आजार असल्यास सर्वसाधारणपणे आवश्यक असलेल्या कव्हरपेक्षा अधिक आरोग्य विमा घेण्याचा विचार करावा.
 
प्रत्येक कुटुंबाने आपल्या गरजा, उत्पन्न, वय आणि आरोग्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन विमा संरक्षण निश्चित करणे गरजेचे आहे. दोन मुले असलेल्या चार सदस्यांच्या कुटुंबाची विम्याची गरज निवृत्त सदस्य असलेल्या कुटुंबापेक्षा वेगळी असू शकते. मुले लहान असतील, तर वारंवार रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता तुलनेने कमी असते; मात्र वय वाढल्यानंतर जीवनशैलीशी संबंधित तसेच वयाशी निगडित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे उपचारांचा खर्चही वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत अधिक विमा संरक्षणाची गरज भासू शकते. आरोग्य विमा घेताना वैद्यकीय महागाईचा दर लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाच वर्षांपूर्वी पुरेसे वाटणारे पाच किंवा दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण आजच्या उपचारांच्या खर्चाच्या तुलनेत कमी पडू शकते.
 
नवीन आरोग्य विमा पॉलिसी घेताना किंवा विद्यमान पॉलिसीचे नूतनीकरण करताना काही महत्त्वाच्या अटी काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. विमा सल्लागार रमेश शर्मा यांच्या मते, पॉलिसी घेताना वेटिंग पीरियड किती आहे, हे सर्वप्रथम तपासावे. म्हणजेच एखाद्या विशिष्ट आजारासाठी विम्याचे संरक्षण सुरू होण्यासाठी किती कालावधी प्रतीक्षा करावी लागणार आहे, याची माहिती घेणे गरजेचे आहे.
 

Related Articles