E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
तिरंदाजीत भारताची सुवर्ण कामगिरी
Wrutuja pandharpure
01 Oct 2026
पुरुष कंपाउंड, महिला आणि मिश्र संघांचे विजय
नागोया
: आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी भारतीय तिरंदाजांनी कंपाउंड प्रकारातील तिन्ही सुवर्णपदके जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. चिकिथा तनीपर्थी, पृथिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांच्या महिला संघाने चीनचा पराभव केला. त्यानंतर चिकिथा आणि साहिल जाधव यांच्या मिश्र संघाने दक्षिण कोरियावर मात केली. पुरुष संघाच्या विजयाने भारताने तिरंदाजीत सुवर्णपदकांची हॅटट्रिक पूर्ण केली.
कुशल दलाल (२१), साहिल राजेश (२५) आणि मणी रत्नम गणेश थिरुमुरु (२०) या युवा त्रिकुटाने दबावाच्या परिस्थितीत संयम राखत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. अंतिम फेरीत तीन राउंडनंतर भारत चीनच्या एका गुणाने पिछाडीवर होता. चीनचे १७९, तर भारताचे १७८ गुण होते. मात्र अखेरच्या सहा बाणांमध्ये भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. चीनच्या एका तिरंदाजाचा एक बाण केवळ आठ गुणांवर लागल्याचा फायदा भारताला झाला. भारताने अखेरीस २३८ गुणांची नोंद केली, तर चीनला २३७ गुणांवर समाधान मानावे लागले.
महिला संघाचे विक्रमी सुवर्ण
ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिथा तनीपर्थी यांच्या भारतीय त्रिकुटाने अंतिम फेरीत चीनचा २३८-२३४ असा पराभव केला. भारताची २३८ गुणांची कामगिरी विश्वविक्रमी ठरली. उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियाला नमविले होते. या विजयासह भारताने हांगझोऊ २०२३ मधील कंपाउंड सांघिक विजेतेपदाचा बचाव केला. सुरुवातीपासून भारताने आघाडी कायम राखली. पृथिका आणि ज्योती यांनी सातत्याने अचूक १० गुणांचे लक्ष्य साधले. तिसर्या फेरीनंतर भारत १७८-१७५ असा आघाडीवर होता. अंतिम फेरीत भारतीय त्रिकुटाने सलग १० गुणांचे लक्ष्य साधत २३८-२३४ असा विजय निश्चित केला.
साहिल-चिकिथाची बाजी
मिश्र संघाच्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण कोरिया यांचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. चार फेर्यांनंतर दोन्ही संघ १५७-१५७ असे बरोबरीत होते. त्यामुळे निकालासाठी शूटऑफ घेण्यात आला. चिकिथाने आणि दक्षिण कोरियाच्या महिला तिरंदाजाने प्रत्येकी १० गुण मिळविले. त्यानंतर साहिलनेही अचूक १० गुण साधले; मात्र कोरियाच्या पुरुष तिरंदाजाला केवळ ९ गुण मिळाले. त्यामुळे भारताने २०-१९ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
सुवर्णासोबत ऑलिम्पिक कोटाही
या विजयामुळे साहिल आणि चिकिथाला २०२८ लॉस एंजिलिस ऑलिम्पिकसाठी स्थान मिळाले. कंपाउंड तिरंदाजीचा ऑलिम्पिकमध्ये २०२८ मध्ये प्रथमच समावेश होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील मिश्र संघ विजेत्यांना ऑलिम्पिकसाठी प्रत्येकी एक पुरुष व एक महिला कोटा मिळणार होता. हांगझोऊ २०२३ मध्ये भारताने तिरंदाजीत विक्रमी नऊ पदके जिंकली होती. त्यात पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश होता.
Related
Articles
काळ्या समुद्रात पुन्हा जहाजावर हल्ला
08 Oct 2026
पुणे बुक फेअरचे प्रसेनजीत फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
08 Oct 2026
पीएमपीच्या ई-बसची बॅटरी लवकर डिस्चार्ज
12 Oct 2026
म्युच्युअल फंडांमध्ये सप्टेंबरमध्ये ३८ हजार कोटींची गुंतवणूक
13 Oct 2026
माढा तालुक्यातील ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत
13 Oct 2026
जो इतिहास विसरतो, त्याचा र्हास होतो
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात