नेमबाजीत नीरू-किनानचा सुवर्णवेध   

४० पैकी ३४ लक्ष्य अचूक साधत केली आशियाई विक्रमाची नोंद 

आयची-नागोया : भारताच्या नीरू धांडा आणि किनान चेनाई या जोडीने आशियाई गेम्स २०२६ मध्ये नेमबाजीच्या मिश्र ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत ३४/४० गुणांची नोंद केली. हा आशियाई विक्रम ठरला. नीरूची अंतिम फेरीतील सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. तिने पहिल्या दोन शॉटमध्ये निशाणा चुकवला, तर सुरुवातीच्या पाच शॉटमध्ये तीन वेळा लक्ष्य हुकले. मात्र, त्यानंतर भारतीय नेमबाजाने जोरदार पुनरागमन केले. नीरू आणि किनानने कामगिरीत सातत्याने सुधारणा करत अंतिम फेरीत अखेर अव्वल स्थान पटकावले.
 
आशियाई विक्रम
 
नीरू आणि किनानने अंतिम फेरीत ४० पैकी ३४ लक्ष्य अचूक साधले. या कामगिरीसह भारतीय जोडीने नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी या प्रकाराच्या अंतिम फेरीतील आशियाई विक्रम कतारच्या नावावर होता. कतारने याच वर्षी जानेवारीत ३० गुणांची नोंद केली होती. अंतिम फेरीत कतारने ३२/४० गुणांसह रौप्यपदक, तर चीनने २३ गुणांसह कांस्यपदक पटकावले. आशियाई स्पर्धेत बुधवारी भारताची सुरुवात शानदार झाली. प्रथम महिला कंपाउंड संघाने तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर चिकिथा तनिपर्थी आणि साहिल राजेश जाधव यांच्या मिश्र संघानेही कंपाउंड तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावले. 
 
दिर्घकाळची प्रतिक्षा संपली 
 
नीरू धांडाचे हे आशियाई गेम्समधील दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी तिने महिला ट्रॅप प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक जिंकत भारताचा या पदकासाठीचा दीर्घ प्रतीक्षाकाळ संपवला होता. आता अनुभवी नेमबाज किनान चेनाईसोबत तिने मिश्र ट्रॅपमध्येही सुवर्णपदक पटकावले. ३६ वर्षीय किनानने या प्रकारात शानदार कामगिरी करत भारताला आणखी एक सुवर्ण मिळवून दिले.

Related Articles