स्क्वॉशमध्ये भारताचे दमदार प्रदर्शन   

महिला-पुरुष संघांची पदके निश्चित

नागोया : भारतीय पुरुष आणि महिला संघांनी बुधवारी अनुक्रमे कुवेत आणि सिंगापूरचा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेतील स्क्वॉशच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे दोन्ही संघांचे पदक निश्चित झाले आहे. अव्वल मानांकित आणि गतविजेत्या भारतीय पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत कुवेतचा २-० असा पराभव केला.
 
अभय, चोटरानी विजयी
 
वीर चोटरानीने पहिल्या एकेरी सामन्यात बदर अलमोगरेबीविरुद्ध चांगली झुंज दिली. मात्र, ३४ मिनिटांच्या सामन्यात त्याने १२-१०, ८-११, ११-०, ११-५ असा विजय मिळवला. भारताचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू आणि एकेरीत रौप्यपदक विजेता अभय सिंहने दुसर्‍या एकेरी सामन्यात अम्मार अल्तमिमीचा ११-३, ११-४, ११-८ असा पराभव करत भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. 
 
अनाहतच्या नेतृत्वाखाली महिला संघ विजयी
 
महिला गटात अनाहत सिंहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत सिंगापूरचा २-० असा पराभव केला. भारताकडून तन्वी खन्नाने सुरुवात करताना पहिल्या एकेरी सामन्यात औ येओंग वाई इयनचा ११-६, ४-११, १५-१३, ११-१ असा पराभव केला. हा सामना ३२ मिनिटे रंगला. एकेरीत रौप्यपदक पटकावणार्‍या अनाहतने दुसर्‍या एकेरी सामन्यात अवघ्या २२ मिनिटांत औ योंग वाई यानचा ११-७, ११-३, ११-४ असा पराभव करत भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले. 

Related Articles