अमेरिकेत पोलाद प्रकल्पासाठी १८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक   

भारतीय कंपनी ’एस्सार-मेसाबी मेटालिक्स’चा पुढाकार

वॉशिंग्टन : अमेरिकेत पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी एस्सार कंपनीशी संबंधित ’मेसाबी मेटालिक्स’ने१८ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली.  या माध्यमातून आयोवा येथे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठा पोलाद प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले.
 
आयोवात १५ अब्ज डॉलर्सचा पोलाद प्रकल्प आणि मिनेसोटा येथील लोह खनिज खाण व लोहखनिजाच्या गोळ्या बनवण्याची सुविधा उभारण्यासाठी सुमारे ३ अब्ज डॉलर्स गुंतवले जाणार आहेत. व्हाइट हाऊस आणि कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०३० पर्यंत उत्पादन अपेक्षित आहे.  दरवर्षी सुमारे १ कोटी टन  पोलादाचे उत्पादन होईल आणि प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर किमान १ हजार ७५० जणांना रोजगार मिळेल.
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये आनंदाने सांगितले की, ’मेसाबी मेटालिक्स’ आयोवा या राज्यात अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठा पोलाद प्रकल्प उभारणार आहे. यावेळी एस्सार समूहाचे संस्थापक आणि उपाध्यक्ष रवी रुईया तसेच त्यांचे पुत्र आणि ’मेसाबी मेटालिक्स’चे अध्यक्ष रेवंत रुईया उपस्थित होते. भारताच्या एस्सार समूहाच्या मालकीची मिनेसोटा-स्थित कंपनी असलेल्या ’मेसाबी मेटालिक्स’ने सांगितले की, या प्रकल्पाच्या बांधकामावेळीं ८ हजाराहून अधिक रोजगार निर्माण होतील. पहिल्या १० वर्षांत अंदाजे ९५ अब्ज डॉलर्सचे आर्थिक उत्पन्न निर्माण होईल.
 
’मेसाबी आयर्न रेंज’मधील नॅशवॉक येथे मिनेसोटा खाणीचा विकास करत आहे. या खाणीतून दरवर्षी सुमारे ७५ लाख टन लोहखनिजाचे उत्पादन होण्याची आणि पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर सुमारे ३५० जणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.
 

Related Articles