गोल्डी ब्रारला पकडून दिल्यास दहा लाख डॉलर्सचे बक्षीस   

एफबीआयची घोषणा; दहा आरोपींच्या यादीत समावेश 

वॉशिंग्टन : कुख्यात गुंड गोल्डी ब्रार याला पकडून देणार्‍यास दहा लाख डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा अमेरिकेच्या एफबीआयने केली आहे. तसेच त्याचे नाव हव्या असलेल्या दहा आरोपींच्या यादीत समाविष्ट केले आहे. 
 
गोल्डी ब्रार ऊर्फ सत्येंद्रजित सिंग हा पसार झालेल्या आणि एफबीआयला हव्या असणार्‍या प्रमुख दहा गुंडांपैकी एक आहे. त्याची माहिती देऊन त्याला पकडून देणार्‍यास दहा लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. तो कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित आहे. अमेरिकेतील विविध ठिकाणी तसेच दक्षिण कॅलिफोर्निया आणि कॅनडात हिंसक घटनांत त्याचा समावेश आहे. त्याच्या मागावर अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआय आहे. तिने आता हवा असलेल्या आरोपींच्या यादीत गोल्डीचा समावेश केला आहे. तो शस्त्रसज्ज, घातक आणि पळून जाण्यात पटाईत असल्याचे म्हटले आहे. राजकीय नेते, धार्मिक व्यक्ती यांच्या हत्येत त्याचा सहभाग आहे. त्याशिवाय खून, अपहरण, खंडणी, हल्ल्यात तो आघाडीवर आहे. अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांचा चोरट्या व्यापारातही तो सहभागी आहे. गोल्डी अमेरिकेत स्थायिक झाला आणि नंतर उत्तर अमेरिकेत टोळीचे नेतृत्व केले. त्याचा माग अमेरिका, युरोप आणि आशियात घेतला जात आहे. 
 

Related Articles