पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा : खर्गे   

नवी दिल्ली : मतदारांच्या विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेत अनियमितता झाली असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तातडीने पदावरुन हटविले पाहिजे. तसेच, निवडणूक आयोगावर दबाव टाकल्याप्रकरणी नैतिकतेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी केली.
 
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आदी उपस्थित होते.
मतदार याद्यांतील घोळ आणि एसआयआरमधील अनियमिततेविरोधात काँग्रेस संसदेत आणि संसदेबाहेर आवाज उठवत राहील, असे खर्गे यावेळी म्हणाले. तसेच, काँग्रेसच्या वतीने पाच प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये मतदार याद्यांमधील बदलांशी संबंधित सर्व माहिती सार्वजनिक करावी, ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली, त्यांना सूचना आणि अपील करण्याची संधी द्यावी, सर्व राजकीय पक्षांना वेळेवर मतदार याद्या उपलब्ध करून द्याव्या यांचा समावेश होता. जिथे त्रुटी आढळतील तिथे स्वतंत्र आणि कालमर्यादित चौकशी केली जावी. तसेच, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असावी. जेणेकरून, कोणालाही शंका येणार नाही, अशी मागणीही त्यांनी केली.
 
दोन निवडणूक आयुक्तांनीच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कृतीला मनमानी असे म्हटले आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपला मदत करत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले असून, मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना त्वरित हटवले पाहिजे, अशी मागणी खर्गे यांनी केली.
 
यासोबतच, मुख्य निवडणूक आयुक्तांवर दबाव टाकल्याबद्दल पंतप्रधानांनीही नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला पाहिजे, असेही खर्गे म्हणाले. मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता असावी आणि निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष असावी, असेही ते म्हणाले. निवडणूक आयोग स्वायत्त असून ते स्वायत्त राहिले पाहिजे. मतदार लोकशाहीचा आत्मा असून, प्रत्येक भारतीयाच्या मताचे रक्षण झाले पाहिजे, असेही खर्गे म्हणाले.
 

Related Articles