सचिन वाझेला जामीन मंजूर   

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने मंगळवारी माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर केला. वाझे पाच वर्षांपासून कारागृहात बंद आहे. 
 
इतर प्रकरणांतही वाझे आरोपी असल्याने तो तुरुंगातून अद्याप तरी बाहेर येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते. सरकारी पक्ष वाझे याच्याविरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत प्राथमिक गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरला, असे न्यायालयाने नमूद केले. विशेष सत्र न्यायाधीश चकोर एस. बाविस्कर यांनी वाझे याला जामीन मंजूर केला. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ’अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर एक संशयित बेवारस मोटार आढळून आली होती. 
 
या मोटारीत जलेटिनच्या २० कांड्या आणि धमकीचे पत्र सापडले होते. ही मोटार उद्योगपती मनसुख हिरेन यांची होती. दरम्यान, ५ मार्च २०२१ रोजी ठाणे जिल्ह्यातील एका खाडीत मनसुख यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आला होता. 
दरम्यान, न्यायालयाने वाझे याला वैयक्तिक जातमुचलका व जामीनदार सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.
 

Related Articles