मतदार यादीवरील हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या   

काँग्रेसची मागणी

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात  सुरू असलेल्या मतदारांची विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) मोहिमेअंतर्गत मतदार यादीमधील नावासंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने १२ ऑक्टोबरपर्यंतची दिलेली मुदत अपुरी आहे. सध्या येत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि  मोठ्या प्रमाणावरील हरकतींची संख्या पाहता हा वेळ पुरेसा नाही. त्यामुळे १२ ऑक्टोबरची मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढवून द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी  मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना पाठवलेल्या पत्रात  केली आहे.
 
निवडणूक आयोगाने मतदार यादीवरील दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी फक्त १२ दिवसांचा कालावधी दिला आहे. आजही  यादीतील १ कोटी ५४ लाख आणि  ४० लाख तरुण मतदारांपैकी फक्त ३ लाख ९० हजार जणांनी नमुना अर्ज ६ मतदार नोंदणीसाठी दाखल केले आहेत. नमुना अर्ज ६ मधील चुका आयोगाच्या  निदर्शनास आणून दिल्या.  परंतु, नवीन अर्जाची  छपाई झालेली नाही.  नागरिकांना नवीन अर्ज उपलब्ध होत नाहीत, याकडे सपकाळ यांनी आयोगाचे लक्ष वेधले. बीएलओ नोटीसा बजावत आहेत. मग नवीन अर्ज कोण स्वीकारणार? शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू आहेत. अनेक बीएलओ  शिक्षक असून, त्यांच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह आहे, असेही ते म्हणाले.
 

Related Articles