देशात १८, तर राज्यात पावसाची १६ टक्के तूट   

पुणे : यंदा पावसाने मोठा दगा दिला असून देशात १८, तर राज्यात पावसाची १६ टक्के तूट आहे. आज (बुधवारी) पावसाळ्याचा कालावधी अधिकृतपणे संपणार असून, ही तूट भरून निघणे आता अशक्य आहे.  त्यामुळे राज्यातील दुष्काळाचे चित्र अधिक गडद होणार आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत आतापासूनच नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. येत्या काळात ही परिस्थिती आणखी भीषण होणार आहे. 
 
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील काही भागांत जोरदार पाऊस पडला. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र, राज्याच्या एकूण पावसाच्या तुटीवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. त्यामुळे पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता आता मावळली आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसामुळे ३१ ऑगस्ट अखेरीस राज्यातील पावसाची तूट १२ टक्के होती. त्यानंतर पावसाचे प्रमाण आणखी कमी झाले. त्यामुळे सप्टेंबरच्या मध्यापर्यंत ही तूट १६ टक्क्यांवर पोहोचली. 
 
३० सप्टेंबरला मान्सूनचा कालावधी अधिकृतपणे संपतो. त्यामुळे १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीतील पावसाचीच मान्सूनच्या एकूण पावसासाठी नोंद घेतली जाते. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील प्रणालीचा देशातील इतर भागांना चांगला फायदा झाला आहे. ३१ ऑगस्ट अखेरीस देशातील पावसाची तूट १४ टक्के होती. २८ सप्टेंबरपर्यंत ही तूट कमी होऊन १२ टक्क्यांवर आली आहे.
 
पूर्व आणि ईशान्य भारतातील पावसाची तूट ३१ ऑगस्टला २६ टक्के होती. २२ सप्टेंबरपर्यंत ती २७ टक्क्यांवर गेली होती. मात्र, त्यानंतरच्या पावसामुळे २८ सप्टेंबरपर्यंत ही तूट २५ टक्क्यांवर आली. वायव्य भारतातील तूटही ११ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाचा फायदा झाला. उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक, तर उत्तराखंडमध्ये ९ टक्के अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात देशातील पावसाची एकूण स्थिती काही प्रमाणात सुधारली असली, तरी महाराष्ट्रातील पावसाची तूट कायम आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले आहे.

विदर्भ, मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर 

यंदा निम्मा विदर्भ आणि बहुतांश मराठवाड्यात पावसाळी हंगामाच्या प्रारंभीपासून मोठ्या पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे पावसाळा संपला नाही, तोपर्यंत विविध प्रकारची पिके हातची गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील अनेक गावांत टँकर सुरू करण्यात आला आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत जाणार आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी या भागातील नागरिकांना कसरत करावी लागणार आहे. 
 

Related Articles