९२ लाखाच्या बनावट नोटांसह तिघे जेरबंद   

अहिल्यानगर : ‘पैशाचा पाऊस पाडतो’ असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीतील पुणे जिल्ह्यातील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून ९२ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या १८ हजार ४१९ बनावट नोटांसह मोबाईल व कार असा एकूण १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
गणेश शेवाळे (३३), सुमित चंदनशिवे (२५) व सुरज कांबळे (२७) अशी आरोपींची नावे आहेत. काल (मंगळवारी) एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी शेवाळे याच्या घराची झडती घेतली. जिन्याखालील पिशवीत बनावट नोटा व त्या तयार करण्यासाठी वापरले जाणारे कोरे कागद आढळले.
 
चौकशीत त्यांनी अंधश्रद्धा निर्माण करून ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवत नागरिकांकडून पैसे उकळण्यासाठी बनावट नोटांचा वापर केल्याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.
 

Related Articles