ऊसाच्या शेतातून १ कोटी ५ लाखांचे अमली पदार्थ जप्त   

२४० गांजाची झाडे जप्त; अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई

सोलापूर, (प्रतिनिधी) : दक्षिण पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मौजे आळगी, (ता. अक्कलकोट) येथे ऊसाच्या शेतात लागवड केलेली अमली पदार्थ जप्त करून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल २११ किलो १०० ग्रॅम वजनाची २४० गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकने यांनी दिली आहे.
 
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त केले होते.
 
२८ सप्टेंबर २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व पथक करजगी दुरक्षेत्र परिसरात पेट्रोलिंग करीत असताना आळगी येथील एका शेतकर्‍याच्या ऊसाच्या शेतात गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित शेतात कारवाई केली. पोलिसांनी शेताची पाहणी केली असता ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी सुमारे १२ फूट उंचीची गांजाची झाडे आढळून आली. पंचनाम्याअंतर्गत केलेल्या कारवाईत एकूण २४० झाडे मिळून आली. त्यापैकी २१० झाडे जिवंत तर ३० झाडे वाळलेली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या झाडांचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम भरले. या प्रकरणी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट) यांच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत.
 
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोहेकॉ मोसलगी, चिंचोलकर, पोलीस कॉन्स्टेबल कोळी, पोलीस कॉन्स्टेबल धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल डोंगरीतोट, मपोकॉ सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल बिराजदार, पोलीस कॉन्स्टेबल अन्सारी, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल पवार, पोलीस कॉन्स्टेबल माने यांनी बजावली आहे.
 

Related Articles