निलेश घायवळसह सहा आरोपींची सुटका   

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळसह सहा आरोपींची एका खंडणी प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. विशेष मकोका न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सुनावणीदरम्यान तक्रारदारानेच आपल्या मूळ तक्रारीतील आरोपांना छेद देत पोलिसांच्या दबावामुळे तक्रार नोंदवून घेतल्याचा दावा केला. त्याचबरोबर अन्य साक्षीदार आणि पंच साक्षीदारांनीही सरकारी पक्षाच्या आरोपांना पाठिंबा न दिल्याने अभियोजन पक्षाचा खटला कमकुवत झाला. परिणामी, सबळ व विश्वासार्ह पुरावे नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
 
निलेश घायवळ, संतोष धुमाळ, मुसा शेख, अक्षय गोगावले, कुणाल कंधारे आणि विपुल माझीर, अशी पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. घायवळ हा अन्य एका गुन्ह्यात कारागृहात असताना, त्याच्या सांगण्यावरून संतोष धुमाळ याने तक्रारदाराकडे ‘भावाच्या फेरीसाठी जीप हवी आहे’ असे सांगून खंडणीची मागणी केल्याचा आरोप गुन्हे शाखेने केला होता. या प्रकरणात घायवळसह त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती.

न्यायालयात फिर्यादीचीच वेगळी भूमिका

सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाला मोठा धक्का बसला. तक्रारदाराने न्यायालयात साक्ष देताना आपल्या मूळ तक्रारीपासूनच माघार घेतली. पोलिसांनी दबाव टाकून आपल्याकडून तक्रार नोंदवून घेतल्याचा दावा त्याने केला. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नोंदविण्यात आलेल्या जबाबातही तक्रारदाराने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले. खटल्यादरम्यान तक्रारदारासह अन्य साक्षीदार आणि पंच साक्षीदारांनीही सरकारी पक्षाच्या आरोपांना समर्थन दिले नाही. त्यामुळे आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली विश्वासार्ह आणि ठोस साक्ष उपलब्ध झाली नाही.

घायवळ पसार झाल्यामुळे वेगळे वळण

घायवळ सध्या परदेशात फरारी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. २०२१ मधील एका दरोड्याच्या गुन्ह्यात त्याला जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पासपोर्ट जमा न करता आडनावातील अक्षरांमध्ये झालेल्या बदलाचा फायदा घेत त्याने सप्टेंबरमध्ये व्हिसा मिळवून देश सोडल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे.यानंतर कोथरूड परिसरातील गोळीबाराच्या प्रकरणात घायवळ टोळीविरुद्ध पुन्हा मोक्का कायद्यान्वये कारवाई सुरू असताना घायवळ पोलिसांना गुंगारा देऊन युरोपमध्ये पसार झाल्याचे समोर आले. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. 
 

Related Articles