विकासासाठी मेट्रो, रस्ते आणि पाणीपुरवठ्यावर भर   

देशाच्या अर्थव्यवस्थेतील शहराचा वाटा १० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट 

पुणे : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेला ‘पुणे ग्रोथ हब’ आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा, पर्यटन आणि रोजगारनिर्मिती अशा क्षेत्रांचा या आराखड्यात समावेश आहे. शहरात २५० किलोमीटरचे मेट्रो जाळे, तसेच ११ रेल्वे आणि १३ रस्ते प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. प्रवासी वाहतुकीसाठी १२ ते १४ हजार बस उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव आहे.
 
नीती आयोगाच्या ‘ग्रोथ हब’ उपक्रमांतर्गत तयार झालेल्या या आराखड्यात शहराची अर्थव्यवस्था २०३६ पर्यंत २०० ते २२० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ५८ प्राधान्य प्रकल्पांवर नऊ ते दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगारनिर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे.

विस्तारणार्‍या पुण्यासाठी पाण्याची तरतूद

वाढत जाणार्‍या शहराची पाण्याची गरज भागवण्यासाठी मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी, भीमा खोर्‍यातून मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा, पाण्याचा पुनर्वापर, कार्यक्षम वितरण आणि जलसाठ्यांतील गाळ काढणे यांवर भर देण्यात येणार आहे.
 
आराखड्यानुसार, पुण्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाटा सध्याच्या ६ ते ६.५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. उत्पादन, वाहन व विद्युत वाहननिर्मिती, अभियांत्रिकी वस्तू, संरक्षण, रोबोटिक्स व ड्रोन, इलेक्ट्रॉनिक्स व सेमीकंडक्टर आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे. झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आणि जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचाही आराखड्यात समावेश आहे.

पर्यटनाला विशेष महत्त्व

पुणे आर्थिक प्रदेशाला देशातील पहिल्या दहा पर्यटनस्थळांमध्ये स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी तलाव पर्यटन; क्रीडा व साहसी पर्यटन; आरोग्य व विवाह पर्यटन; कार्यक्रम पर्यटन; वन्यजीव पर्यटन; आणि धार्मिक-सांस्कृतिक पर्यटन या सहा क्षेत्रांना प्राधान्य दिले आहे. शिवनेरी, लोहगड, राजगड आणि सिंहगड यांना जोडणारा किल्ले परिपथ, पवना व भाटघर येथे जलपर्यटन केंद्रे, सह्याद्रीतील ६०० किलोमीटरचा खुला पदभ्रमण मार्ग, आरोग्य पर्यटन पट्टा आणि जुन्नर बिबट सफारी हे त्यातील प्रमुख प्रस्ताव आहेत.
 

Related Articles