घनकचरा विभागातील ५ हजार २५१ कर्मचारी क्षेत्रीय कार्यालयांकडे वर्ग   

काम चुकारपणाला बसणार आळा 

पुणे : सफाई कर्मचार्‍यांच्या हजेरीचा गोंधळ आणि काम चुकारपणाला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने स्वच्छतेची जबाबदारी ठेकेदारांवर टाकून घनकचरा विभागातील ५ हजार २५१ कायम कर्मचारी क्षेत्रीय कार्यालयांकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे या कर्मचार्‍यांची नेमणूक, त्यांच्याकडून काम करून घेणे तसेच काम चुकारांवर कारवाई करण्याची जबाबदारी आता संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक महापालिका आयुक्तांवर राहणार आहे.
 
महापालिकेने सफाई कर्मचार्‍यांच्या कामावर डिजिटल पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी ‘फेस रेकग्निशन’ प्रणाली सुरू करण्यात आली होती. ही प्रणाली २६ मेपासून सुरू केल्यानंतर म्हणून प्रत्यक्ष कामावरील हजेरीचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांवरून सुमारे ७० टक्क्यांपर्यंत पोहची होती. यामध्ये इन-आउटच्या नोंदीच्या आधारेच जून महिन्याचा पगार काढण्यात येणार होते. मात्र, काम चुकारपणाची सवय आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे ही प्रणाली गुंडाळण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेची जबाबदारी विविध ठेकेदारांवर सोपविली आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी किती मनुष्यबळ वापरायचे, मनुष्यबळाद्वारे की यंत्राद्वारे काम करायचे, याचे नियोजन ठेकेदारांनी करायचे आहे. महापालिकेचा मुख्य भर परिसराची स्वच्छता राखण्यावर राहणार आहे.
 
त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील ५ हजार २५१ कायम कर्मचारी क्षेत्रीय कार्यालयांकडे वर्ग केले आहेत. या कर्मचार्‍यांची नेमणूक कुठे करायची, त्यास काय काम द्यायचे, तसेच त्याने काम कुचारपणा केल्यास त्यावर काय कारवाई करायची, याची संबंधीत क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांची राहणार असल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिली.

कोणत्या क्षेत्रीय कार्यालयांकडे किती कर्मचारी वर्ग 

नगररोड-वडगावशेरी - २३७
येरवडा-कळस-धानोरी - ३०३
ढोलेपाटील रोड - ३७५
औंध-बाणेर रोड - ३२८
शिवाजीनगर-घोले रोड - ५१०
कोथरूड-बावधन - १६७
धनकवडी-सहकारनगर - ४५२
सिंहगड रोड - ३३८
वारजे-कर्वेनगर - २१६
हडपसर-मुंढवा - २३७
वानवडी-रामटेकडी - १७१
कोंढवा-येवलेवाडी - ११७
कसबा - ६८४
विश्रामबागवाडा - ७२६
बिबवेवाडी - ३९०
 

Related Articles