कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम पुढील वर्षी पूर्ण करणार   

आयुक्तांकडून कामाची पाहणी

पुणे: कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या दहा मिळकतींचा ताबा मिळावा यासाठी मंगळवारी मोजणी प्रक्रिया सुरू झाली.  लवकरच यासह उर्वरीत मार्गीका ताब्यात येतील.  या रस्त्याच्या कडेला असलेल्या सेवा वाहिन्यांची कामे गतीने करून येत्या मार्च अखेरपर्यंत ५० मीटर प्रमाणे रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
 
आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला भेट दिली. यावेळी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यासह प्रकल्प व पथ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले, सध्या रस्त्याचे तसेच राष्ट्रीय महामार्गाच्यावतीने सुरू असलेल्या कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. तसेच कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी राजस सोसायटी चौक ते कान्हा हॉटेल दरम्यानच्या दहा मिळकती अद्याप ताब्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कामावर काहीसा परिणाम झाला आहे. या मिळकतींची आज संयुक्त मोजणी झाली. यावेळी मिळकतधारकांशीही चर्चा झाली. लवकरच या मिळकती ताब्यात येतील. तसेच कान्हा हॉटेलच्या पुढील भागातील मिळकतींच्या संपादनाची प्रक्रिया देखिल गतीने करण्यात येईल. ज्या ठिकाणी भूसंपादन झाले आहे, तेथे जागेवर काम सुरू आहे.
 
कात्रज कोंढवा रस्ता सध्या ५० मी. रुंदीचा करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्याप्रमाणावर लोकवस्ती असल्याने ठिकठिकाणी वाहनांसाठी पंक्चर्स ठेवण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक मंदावते. मुख्य रस्त्याला जोडणार्या रस्त्यांच्या रुंदीचा विचार करून छोट्या रस्त्यांवरील अधिकाअधिक पंक्चर्स बंद करण्यात येतील. पन्नास मीटरचा रस्ता तयार होत असताना सर्व्हिस रस्त्यावरून थेट मुख्य रस्त्यावर वाहने येऊ नयेत यासाठी जाळ्या लावण्याचे नियोजन आहे. 
 

Related Articles