सुजीत, अंतिम, अमनसमोर पदकासाठी खडतर आव्हान   

नागोया : सुजीत कलकलचा दमदार फॉर्म, अंतिम पंघालचे पुनरागमन आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता अमन सहरावतचे आशियाडमधील पुनरागमन ही भारतीय कुस्तीची प्रमुख आकर्षणे आहेत. मात्र, तिघांनाही कठीण ड्रॉ मिळाल्याने पदकाची वाट खडतर असेल. विशेष म्हणजे, प्रत्येक वजनी गटातील पात्रता, उपांत्य आणि पदकाच्या लढती एकाच दिवशी होणार आहेत.

सुजीतकडून पदकाची अपेक्षा

६५ किलो फ्रीस्टाइलमध्ये सुजीत भारताचा प्रमुख पदक दावेदार आहे. २०२६मध्ये त्याने आशियाई अजिंक्यपदासह झाग्रेब ओपन आणि मुहामेत मालो रँकिंग मालिकेत सुवर्णपदके जिंकली आहेत. संभाव्य उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ इराणच्या अब्बास इब्राहिमजादेहशी, तर उपांत्य फेरीत जपानचा ऑलिम्पिक विजेता कोटारो कियोकाशी पडू शकते.

अंतिमसमोर चीनच्या झांगचे आव्हान

महिलांच्या ५३ किलो गटात अंतिम पंघालचे आव्हान असेल. हांगझोऊ आशियाडची कांस्यपदक विजेती अंतिमच्या ड्रॉमध्ये चीनची झांग जिन असून, दोघींमध्ये संभाव्य उपांत्य फेरीची लढत होऊ शकते. यापूर्वी झालेल्या दोन्ही लढती अंतिमने जिंकल्या आहेत. राष्ट्रीय निवड चाचणीच्या अंतिम फेरीत मीनाक्षी गोयतचा पराभव करून तिने भारतीय संघातील स्थान निश्चित केले.

अमनसाठीही खडतर वाट

५७ किलो गटात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता अमन सहरावतसमोरही कठीण आव्हान आहे. सुरुवातीच्या फेरीत त्याची लढत उझबेकिस्तानचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता गुलोमजोन अब्दुल्लाएव किंवा जपानच्या यामातो ओगावाशी होऊ शकते. उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानचा नूरदानत एतानोव, तर उपांत्य फेरीत इराणचा अली मोमेनी संभाव्य प्रतिस्पर्धी आहे.
 

Related Articles