परवीन-अंकुश अंतिम फेरीत; पदक निश्चित   

मुष्टियुद्ध स्पर्धा 

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय मुष्टियोद्ध्यांची दमदार कामगिरी कायम असून, परवीन हुड्डा आणि अंकुश पंघाल यांनी आपापल्या गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे दोघांचेही पदक निश्चित झाले असून, त्यांचे लक्ष्य आता सुवर्णपदकावर आहे. दरम्यान, नरेंदरला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
 
महिलांच्या ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत परवीन हुड्डाने चीनच्या ली शूचा ५-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. परवीनने दमदार पुनरागमन करत आशियाई स्पर्धेतील पदक निश्चित केले आहे. अंतिम फेरी गाठणारी ती भारताची तिसरी महिला मुष्टियोद्धा ठरली.

अंकुशकडून विश्व विजेत्याचा पराभव

पुरुषांच्या ८० किलो गटाच्या उपांत्य फेरीत अंकुश पंघालने उझबेकिस्तानच्या फज्लिद्दीन एर्किनबोएवचा ४-१ असा पराभव केला. आशियाई स्पर्धेत पदार्पण करणार्‍या अंकुशने पहिली फेरी १-४ अशी गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले. दुसर्‍या फेरीत अचूक ठोसे लगावत त्याने आघाडी मिळवली आणि अखेर स्प्लिट डिसिजनमध्ये विजय मिळवला. ७५ किलो गटाचा विद्यमान विश्वविजेता एर्किनबोएववर मिळविलेल्या या विजयासह अंकुशने अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. गेल्या आठ वर्षांत आशियाडची अंतिम फेरी गाठणारा तो भारताचा पहिला पुरुष मुष्टियोद्धा ठरला.

नरेंदरला कांस्य

पुरुषांच्या ९० किलोपेक्षा अधिक वजनी गटाच्या उपांत्य फेरीत भारताच्या नरेंदरला कझाकस्तानच्या ऐबेक ओरलबायविरुद्ध ०-५ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ओरलबायने मात्र अंतिम फेरीत प्रवेश केला.
 

Related Articles