महिला हॉकी संघासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान   

नागोया : आशियाई स्पर्धेत ४४ वर्षांपासून सुरू असलेला सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय महिला हॉकी संघासमोर बुधवारी उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचे कडवे आव्हान असेल. भारताने स्पर्धेत आतापर्यंत सलग पाच विजय मिळवत अपराजित कामगिरी केली आहे. आता आणखी दोन विजय मिळवल्यास भारताला दुसरे एशियाड सुवर्णपदक मिळवता येईल. भारताने यापूर्वी १९८२ मध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकले होते.

भारताची दमदार कामगिरी

भारताने पूल बीमधील पाचही सामने जिंकत अव्वल स्थान मिळवले. उझबेकिस्तानवर १९-०, इंडोनेशियावर १७-१, थायलंडवर २०-१, जपानवर ३-१ आणि सिंगापूरवर ७-० असा भारताचा विजयाचा प्रवास राहिला. जागतिक क्रमवारीत भारत आठव्या, तर दक्षिण कोरिया १५व्या स्थानावर आहे. कोरियाने पूल एमध्ये चार विजय मिळवत चीननंतर दुसरे स्थान पटकावले. त्यांचा एकमेव पराभव चीनविरुद्ध ०-३ असा झाला. भारताच्या आक्रमणाची धुरा ड्रॅग-फ्लिक तज्ज्ञ दीपिका सांभाळत असून तिने पाच सामन्यांत तब्बल २१ गोल केले आहेत. 

Related Articles