अखंड सावधानता बाळगण्याची गरज   

शिक्षण बोध : संदीप वाकचौरे

समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या समग्र साहित्यात आणि विशेषत: दासबोध या ग्रंथात मानवी जीवनाला दिशा देणारी, उन्नतीचा विचार प्रतिपादन करणारी अनेक शहाणपणाची लक्षणे सांगितली आहेत. समर्थानी समाजात राहणार्‍या आणि समाजाचे नेतृत्व करू पाहणार्‍या प्रत्येकासाठीच मार्गदर्शन केले आहे. समाजाचे नेतृत्व करू पाहत आहेत, ज्यांना लोकसंग्रह करण्याची मनीषा आहे. आदर्श जीवन जगण्याची मनीषा आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मार्गदर्शक स्वरूपात समर्थ काही सांगू पाहात आहेत. मुळात असे कितीतरी श्लोक दासबोधात आहेत की, जे आपण समजून घेतले, तर जीवन जगण्यासाठी तत्त्वज्ञान विशद करणारे अनेक श्लोक आपल्या हाती लागतील. दासबोधात केवळ आदर्शवादी विचारांचा संग्रह नाही, तर त्यात जीवन व्यवहाराचा विचार केला आहे. संतांच्या साहित्यात शहाणपणाची वाट पुरेपूर भरलेली आहे. त्यामुळे ज्यांना संतांच्या साहित्यात जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा धागा सापडला आहे अशा कितीतरी माणसांनी आपल्या जीवनांची उंची वाढवून, जीवन सार्थकी लावण्याचा प्रयत्न केला आहे. समर्थ आपल्या साहित्यातून मानवी जीवनात नेमके कसे जगावे हे सांगत आहे. अखंड सावध असावे| क्षमा करोनी शिकवावे| प्रत्ययो येईल ते करावे| प्रत्ययाविण करू नये॥  या श्लोकाचा मूळ गाभा व्यावहारिक चातुर्य, व्यवस्थापन कौशल्य, मानवी मानसशास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या चार स्तंभांवर आधारलेला आहे. जीवन यशस्वी करायचे असेल, तर आपण नेमके काय करायला हवे हे सांगताना ते म्हणतात की, मानवी जीवनात माणसांने अखंड सावधानता बाळगण्याची गरज आहे. सातत्याने प्रत्येक क्षणी जागरूकता आणि सतर्क राहण्याची गरज व्यक्त करत आहेत. अखंड सावध असावे असे समर्थ रामदास स्वामीच नाही तर सर्वच संत सांगत आहेत. 
 
माणसांच्या आयुष्यात अधिक आनंद आणि समृद्धतेची वाट सापडावी म्हणून उपदेश करणारे अभंग, ओव्या, श्लोक लिहून त्यांनी माणसांना चिरंतन सत्याची वाट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आज जो श्लोक निवडला आहे, त्यातील संदेश केवळ आध्यात्मिक स्वरूपाचा नाही. तर तो वर्तमानातील व्यावहारिक, राजकीय-सामाजिक परिस्थितीला धरून आहे. आपण अनेकदा असे म्हणतो की, संत साहित्याला आता अनेक वर्षे झाली आहेत. शतक पार पडले आहे. मग त्याचा काय उपयोग ? पण आपण जेव्हा संतांचे साहित्य वाचत जातो आणि सूक्ष्मतेने अर्थ शोधत जातो तेव्हा त्यांचे साहित्य वर्तमानातही अधिक उपयोगाचे आहे असे लक्षात येईल. समर्थ या श्लोकात जो ‘अखंड’ शब्द वापरत आहेत, त्यात अखंड म्हणजे सातत्याने अगदी प्रत्येक क्षण असाच गृहीत धरायला हवा. सातत्याने सावध राहण्याची गरज आहे. विद्यार्थी असाल, तर एक क्षण जरी तुम्ही बेसावध राहिला, तरी अपयश ठरलेलेे. नोकरी करत असाल, तर जागृती महत्त्वाची असतेच. अखंड काळ जी माणसं जागरूक आणि सावध असतात, त्यांच्या जीवनात त्यांना कधीच अपयश येत नाही. सावधानता ही कोणत्याही क्षेत्रात तुम्ही कार्यरत असला, तरी आवश्यक गुण आहे. ’सावध’ म्हणजे सतर्क, जागरूकता. समाजात वावरताना आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात. प्रत्येक माणूस आपल्याला जो भेटतो तो काहींना काही हेतू ठेवूनच भेटत असतो. कोणत्याही हेतू शिवाय भेट जणू अशक्यच आहे. प्रत्येक माणूस जो भेटतो त्या प्रत्येकाचा हेतू भिन्नच असतो. त्यांचा कोणाचाही हेतू समान असण्याची शक्यता नाही. ही विविध हेतूची माणसे जर आपल्याला भेटत असतील, तर अशा वेळी आपण किती जागरूक राहण्याची गरज आहे हे सहजपणे लक्षात येईल. माणूस आळशी, निष्काळजी राहिला, तर त्याचे मोठे नुकसान होऊ शकते. आपण आज जी गोष्ट करायला हवी, ती आपण आज केली नाही, तर त्याचा परिणाम भविष्यातील मार्गावर होण्याचा धोका आहे. अगदी एखादा विद्यार्थी आहे, त्याने विद्यार्थिदशेत अभ्यास केला नाही, तर त्याचा  परिणाम म्हणजे त्याला परीक्षेतील पेपर अवघड जाणे घडेल. पेपर अवघड गेला की, त्याचे फलित त्याच्या प्रगतिपत्रकावर प्रतिबिंबीत होणार. मार्क कमी पडले म्हणून भविष्यात चांगल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्याची शक्यता नाही, मिळाले तर चांगले महाविद्यालय मिळणार नाही. चांगला अभ्यासक्रम नाही, म्हटल्यावर भविष्यातील जीवनाच्या मार्गासाठी लागणारी उत्तम नोकरी मिळण्याची शक्यता नाही. उत्तम नोकरी नाही किंवा उत्तम व्यवसाय नाही, तर हाती गरजे इतका पैसा नाही. पैसा नाही म्हटल्यावर चांगले जीवनमान कसे येणार ? त्यामुळे चांगले जीवनमान, समृद्ध जीवनासाठी आपल्याला विद्यार्थिदशेत चांगला अभ्यास केला, तर भविष्याचे जीवन प्रकाशमय होण्याची शक्यता आहे. 

जागरूक राहा

विद्यार्थी दशेतील जागरूकता जशी आपल्याला आनंदी भविष्य देते, त्याप्रमाणे जेव्हा आपण नोकरी करतो तेव्हादेखील आपण अधिक जागृत राहून वाटचाल करावी लागते आहे. आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत, तेथील क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. नवनवीन संशोधन होत आहेत. त्याचा परिणाम आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रावर होणार असतो. आपण जागरूकतेने समजावून न घेता मार्गक्रमण केले, तर आहे ती नोकरी टिकण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी आपण किती दक्ष राहण्याची गरज आहे हे लक्षात येईल. योग्य वेळी दक्षता बाळगली नाही, तर त्याचे किती दीर्घकाळ परिणाम होतात हे अनेकदा अनुभवावरून सहजतेने लक्षात येईल. तेवढा काळ गेला, की मग पुढे फार काही परीवर्तनाची वाट चालता येणार नाही. समर्थांचा कालखंड जो आहे, त्या काळात राजकीय, सामाजिक दृष्ट्या अस्थिरता होती, त्यामुळे शत्रूचा आणि कपटी लोकांचा सुगावा लागण्यासाठी ’सावधपणा’ अत्यंत गरजेचा होता. त्यामुळे त्यावेळी दिलेला संदेश किती महत्त्वाचा होता हे सहजपणे लक्षात येईल. आधुनिक काळातही विविध कारणांनी फसवणूक, सायबर गुन्हे, आणि व्यावसायिक स्पर्धा तीव्र आहे. या सर्व स्पर्धेत आपल्याला खरोखर टिकण्याची गरज आहे. आपण जर या स्पर्धेत टिकलो नाही, तर भविष्य अंधारमय होण्याचा धोका आहे. त्यामुळे आपल्याला आजच्या तीव्र स्पर्धेत स्वतःचे स्थान निर्माण करण्याबरोबर ते स्थान टिकण्यासाठी अखंड सावधानता तितकीच गरजेची आहे. जो सावधान नाही, त्याला जीवनात यश नाही हे वास्तव आपण स्वीकारायल हवे. तुम्ही उद्योगात असा किंवा नोकरीत असा, तुम्हाला सर्वत्र जागरूकता स्वीकारावीच लागते, तरच तुम्ही यशाला गवसणी घालू शकतात. जो असावधान आहे, त्याच्या आयुष्यात जगणे कधीच प्रकाशमान असण्याची शक्यता नाही.

चंचल मनास आवरावे

माणसाचे मन अत्यंत चंचल आहे हे अनेक मानसशास्त्रांनी सांगितले आहे. माणसाच्या मनाचा परिणाम शरीरावर होत असतो. माणूस अनेकदा विचाराने वर्तन करण्यापेक्षा भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता अधिक असते. मनात कधीही आळस, काम, क्रोध, लोभ किंवा अहंकार यांसारखे षडरिपू प्रवेश करू शकतात. त्यांनी एकदा का प्रवेश केला की, आपल्या हाती नियंत्रण असावे यासाठी तरी बुद्धीला ’अखंड सावध’ ठेवावे लागते. जो प्रत्यक्ष क्षणी माणूस सावध असतो, तो संकटांचा अंदाज आधीच बांधू शकतो आणि स्वत:चा बचाव करू शकतो. आपल्या जीवनात अंहकाराचा स्पर्श होऊ नये. आपल्याला संकटाचा मात करताना संघर्षाची वेळ आली, तरी पराभव होत नाही. पराभव झाला तरी तो जीवघेणा होत नाही. त्या पराभवाने खचून न जाता अधिक चांगल्या पद्धतीने त्याला सामोरे जाण्याची विचार शक्ती आपल्याला मिळत जाते. विचारांची शक्ती निर्माण झाली की, संघर्ष करण्याची शक्ती मिळते यात शंका नाही. 
 
क्षमाशीलतेने लोकशिक्षण, सहअनुभूती आणि प्रेमाने प्रबोधनाची वाट चालण्याची गरज असते. क्षमा करोनी शिकवावे असे समर्थ सांगता आहेत. मुळात आपण माणसांकडे माणूस म्हणून पाहाण्याची गरज आहे. माणूस म्हणजे चुकांचा पुतळा आहे. अशा वेळी आपण झालेल्या चुकांचा बाऊ करत केवळ त्याच लक्षात घेऊन वर्तन करू लागलो, तर मानवी स्नेहबंध उंचावू शकणार नाही. त्यामुळे क्षमाशीलतेची भूमिका जीवनात आपल्याला नेतृत्व करण्याची संधी मिळून देत असते. जीवन व्यवहारात लोकसंग्रह करताना किंवा समाजाला शहाणे करताना चुका या होणारच. लोक अज्ञानी असतात, त्यांच्याकडून चुका होतात. किंबहुना जो काम करतो त्याच्याच चुका होतात. अशा वेळी समाजाचे नेतृत्व करू पाहणार्‍या खर्‍या नेत्याने किंवा वर्गाचे, कार्यालयाचे नेतृत्व करू पाहणार्‍या शिक्षकाने क्रोधाच्या आहारी न जाता क्षमाशील वृत्ती ठेवली पाहिजे. लोकशिक्षणाचा उद्देश लोकांना दूर घालवणे नव्हे, तर त्यांना जवळ आणून सुधारणे हा आहे. 
 
समर्थ म्हणतात की, समोरच्या चुका मोठ्या मनाने पोटात घालणे याचा अर्थ त्यांना क्षमा करणे. त्याला योग्य काय ते प्रेमाने समजावून सांगणे महत्त्वाचे असते. क्षमा हा दुर्बलांचा गुण नव्हे, तर बलवानांचा गुण आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा करून शिकवता, तेव्हा त्याच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. भीती दाखवून तात्पुरती शिस्त लावता येईल, पण कायमस्वरूपी परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर ’क्षमा करोनी शिकवावे’ हाच एकमेव मार्ग आहे. अनुभवाधिष्ठित कृती प्रत्ययो येईल ते करावे| प्रत्यय म्हणजे अनुभव, प्रचिती किंवा स्वतः घेतलेला अनुभव आणि त्यातून मिळालेली खात्री. यातून समर्थ वैज्ञानिक आणि तार्किक दृष्टिकोन अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहेत. एका अर्थाने समर्थ आंधळे अनुकरण नको असेच सांगत आहेत. केवळ कोणीतरी सांगितले, जुन्या रूढी-परंपरा आहेत, किंवा बहुसंख्य लोक ती गोष्ट करत आहेत, म्हणून कोणतीही गोष्ट करू नका. बुद्ध जे सांगायचे की, मी सांगतो त्यावर विश्वास ठेवू नका, त्यापेक्षा तुम्ही अनुभव घ्या आणि तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे अनुभवास येते, तो विचार स्वीकारा. ज्या गोष्टीचा विवेकबुद्धीला आणि अनुभवाला ’प्रत्यय’ येतो, जी गोष्ट न्याय्य आणि सत्य वाटते, तीच कृती माणसाने करावी. जेव्हा आपण अनुभवाच्या पायावर एखादे काम करतो, तेव्हा त्यात यशाची खात्री जास्त असते. व्यापार, राजकारणात किंवा दैनंदिन व्यवहारात ज्या योजनांचा किंवा मार्गांचा सकारात्मक प्रत्यय आधी आलेला आहे, त्यांचाच अवलंब करावा. अनुभवाचे शहाणपण आपल्याला मिळायला हवे. त्यामुळे ऊर्जेचा आणि वेळेचा अपव्यय टळतो. अनुभव हा सर्वांत चांगला गुरू आहे.

अंधश्रद्धेचा निषेध

आपल्या संत साहित्यात अंधश्रद्धेचा विचार कोठेच करण्यात आलेला नाही. अंधश्रद्धा आणि संशयास्पद गोष्टींचा संत निषेधच करत आहेत. समर्थ सांगतात की, प्रत्ययाविण करू नये याचा अर्थ अत्यंत ठाम असा नियम ते सांगू पाहात आहेत. ज्या गोष्टीला अनुभवाचा, पुराव्याचा किंवा विवेकाचा आधार नाही, ती गोष्ट कदापि देखील करू नये. समर्थ रामदास स्वामी हे देखील अंधश्रद्धेचे कट्टर विरोधक होते. चमत्कार, दिशाभूल करणार्‍या गोष्टी किंवा ज्या गोष्टींचा तार्किक आधार नाही, अशा गोष्टींच्या मागे लागू नये असेच ते लोकांना सांगत आले आहेत. ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून घेतलेले निर्णय नेहमी अंगलट येतात. कोणत्याही नवीन क्षेत्रात उडी मारताना किंवा अपरिचित व्यक्तीवर विश्वास ठेवताना जर तुम्हाला खात्री नसेल, तर थांबणे योग्य. ’प्रत्ययाविण’ केलेली कृती ही अंधारात मारलेल्या अविचाराच्या उडीसारखी असते, ज्यातून केवळ अपयश आणि पश्चात्ताप हाती येतो. समर्थ रामदास स्वामीं या श्लोकांमधून यशस्वी आणि सन्माननीय जीवन जगण्याचा एक महामंत्र सामान्य माणसाला देऊ पाहत आहेत. समाजात काम करताना सतत सतर्क राहणे, अखंड सावध असणे, माणसांशी व्यवहार करताना उदार आणि सहनशील असणे, वैयक्तिक विचार व निर्णय घेताना नेहमी वैज्ञानिक, तार्किक आणि अनुभवाच्या मार्गाचा अवलंब करणे या गोष्टी वर्तमानातील २१ व्या शतकातील व्यवस्थापन आणि नेतृत्व गुणांसाठी देखील आवश्यक असल्याचे ते सांगत आहेत. श्लोकाचा अर्थ समजून घेतल्यानंतर जगण्याच्या प्रक्रियेतील तत्त्वज्ञान सहजतेने उलगडत जाईल. त्यामुळे समर्थांचा विचार प्रत्येकाच्या हिताचा आहे. त्याच दिशेने आपण मार्गक्रमण करण्यासाठी प्रयत्न केले, तर कोणत्याच क्षेत्रात आपल्याला अपयश येण्याची शक्यता नाही.

Related Articles