हलके रणगाडे शत्रूला भरवणार धडकी   

वृत्तवेध 

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनकडून सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराची क्षमता आणखी वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट जोरावर’ला आता वेग मिळाला आहे. या प्रकल्पांतर्गत उंच पर्वतीय आणि दुर्गम भागात तैनात करता येतील असे अत्याधुनिक हलके रणगाडे विकसित करण्यात येणार आहेत.
 
या महत्त्वाकांक्षी संरक्षण प्रकल्पासाठी टाटा समूहाने सर्वांत कमी बोली (एल १) लावून आघाडी मिळवल्याची माहिती आहे. दुसरीकडे, महिंद्रा डिफेन्स सिस्टीम्सलाही या प्रकल्पात सहभागी करून घेण्यात आले असून, कंपनीकडून हलक्या रणगाड्याचा ‘प्रोटोटाइप’ विकसित केला जाणार आहे. त्यामुळे देशातील दोन प्रमुख औद्योगिक समूह संरक्षण क्षेत्रातील या महत्त्वाच्या प्रकल्पात एकत्रितपणे योगदान देणार आहेत. २०२० मधील गलवान संघर्षानंतर पूर्व लडाख आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अनेक उंच भागांमध्ये चीनने आपल्या टाईप-१५ हलक्या रणगाड्यांची तैनाती केली आहे. भारतीय लष्कराकडे असलेले टी-७२ आणि टी-९० हे रणगाडे सुमारे ४५ ते ४६ टन वजनाचे आहेत. त्यामुळे १५ हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवरील दुर्गम आणि अरुंद मार्गांवर त्यांची वाहतूक तसेच वेगाने हालचाल करणे आव्हानात्मक ठरते. ही कमतरता भरून काढण्यासाठी ‘प्रोजेक्ट जोरावर’ हाती घेण्यात आला आहे. 
 
या प्रकल्पांतर्गत २५ टनांपेक्षा कमी वजनाचे अत्याधुनिक हलके रणगाडे विकसित केले जाणार आहेत. कमी वजनामुळे हे रणगाडे दुर्गम पर्वतीय भागात वेगाने पोहोचवणे आणि तैनात करणे शक्य होणार आहे. या हलक्या रणगाड्यांना चिनूक हेलिकॉप्टर तसेच ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ विमानाच्या माध्यमातून एअरलिफ्ट करता येणार आहे. त्यामुळे गरजेनुसार सीमावर्ती भागात कमी वेळेत रणगाडे पोहोचवणे शक्य होईल. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, ‘टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड’ (टीएएसएल) या प्रकल्पासाठी सर्वांत कमी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. त्यामुळे लष्कराच्या गरजा लक्षात घेऊन हलक्या रणगाड्यांचे उत्पादन करण्याची जबाबदारी टाटा समूहाकडे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने ‘महिंद्रा डिफेन्स सिस्टीम्स’लाही हलक्या रणगाड्याचा प्रोटोटाइप विकसित करण्यास सांगितले आहे. त्यामुळे देशातील दोन मोठ्या स्वदेशी उद्योगसमूहांना या प्रकल्पात आपली तांत्रिक क्षमता दाखवण्याची संधी मिळणार आहे. ‘प्रोजेक्ट जोरावर’मधील हलके रणगाडे केवळ वजनाने हलके नसून आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्रणालींचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे शत्रूची ठिकाणे आणि संभाव्य धोके ओळखण्यास मदत होईल. या रणगाड्यांमध्ये टॅक्टिकल ड्रोनच्या वापराची क्षमताही असणार आहे. रणांगणातील परिस्थितीचा आढावा घेणे, शत्रूच्या ठिकाणांची माहिती मिळवणे आणि आवश्यकतेनुसार लक्ष्यावर कारवाई करण्यासाठी ड्रोनचा वापर करता येणार आहे.

Related Articles