भारतातील भूजलात सतत घट   

संयुक्त राष्ट्राच्या अहवालात तीव्र पाणी संकटाचा इशारा

जागतिक हवामान संघटनेने प्रसिद्ध केलेल्या ’स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्सेस २०२५’ या ताज्या अहवालानुसार, भारतातील भूजल पातळीत सातत्याने मोठी घट होत आहे. विशेषतः देशाच्या उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागात ही समस्या अत्यंत गंभीर होत  आहे.
 
भूजल पातळी खाली जाण्याचे मुख्य कारण म्हणजे गरजेपेक्षा जास्त केला जाणारा पाण्याचा उपसा असल्याचे अहवालात नमूद केले आहे. निसर्गाकडून जितके पाणी पुन्हा जमिनीत मुरत आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी बाहेर काढले जात असल्याने पाण्याचे हे चक्र बिघडले.
 
अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे 
 
- जागतिक पातळीवर चिंताजनक स्थिती : २०२५ मध्ये जगभरातील भूजल निरीक्षण केंद्रांपैकी ३४ टक्के केंद्रांवर सरासरीपेक्षा कमी किंवा अत्यंत कमी जलपातळी नोंदवली गेली आहे, जी २०२४ मध्ये २५ टक्के  होती.
 
- नद्यांची बिकट अवस्था : पृथ्वीवरील गोड्या पाण्याच्या साठ्यात दीर्घकाळ घट होत असून, २०२५ हे वर्ष गेल्या तीन दशकांतील नद्यांसाठी सर्वात कोरड्या वर्षांपैकी एक ठरले आहे.
 
- बचत खाते रिकामे होत आहे : सरचिटणीस सेलेस्टे साउलो यांनी चिंता व्यक्त करताना म्हटले की, आम्ही आपल्या निसर्गाचे ’बचत खाते’ (पाण्याचा साठा) वेगाने संपवत आहोत.
 
इशारा : जर भूजलाचा असाच अनिर्बंध उपसा सुरू राहिला, तर भविष्यात मानवजात आणि अर्थव्यवस्था या दोन्हीवर याचे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात.
 
महाराष्ट्रातील भूजल स्थिती 
 
भूजल  पाहणी आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील भूजल पातळीमध्ये अत्यंत संमिश्र आणि चिंताजनक बदल पाहायला मिळत आहेत.
अर्ध्याहून अधिक भागात घट : राज्यातील एकूण ३५३ तालुक्यांपैकी १६५ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत लक्षणीय घट नोंदवली गेली.
 
सर्वात जास्त प्रभावित जिल्हे : पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या जिल्ह्यांमधील बर्‍याच तालुक्यांमध्ये भूजलाचा उपसा जास्त झाल्यामुळे पाणी पातळी झपाट्याने खाली गेली आहे.
 
अतिअवलंबित्व : महाराष्ट्रातील ७५ टक्के सिंचन आणि ग्रामीण भागातील तब्बल ८५ टक्के पिण्याचे पाणी पूर्णपणे भूजलावर (विहिरी आणि कूपनलिका) अवलंबून आहे. यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच बर्‍याच गावांतील विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत.
 
इशारा : आंतरराष्ट्रीय अहवालाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील भूजल पातळीची सद्यस्थिती चिंताजनक असून त्यावर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. 
 
पाणी टंचाईवर मात करण्यासाठीचे महत्त्वाचे उपाय
 
भूजल पातळी पुन्हा उंचावण्यासाठी आणि राज्याला जलसंकटातून वाचवण्यासाठी पुढील बहुआयामी उपाययोजना करण्याची गरज आहे. हे उपाय सातत्याने आणि गांभीर्याने केल्यास हे  प्रमाणात कमी होऊ शकते. 
 
१ जललेखा आणि डिजिटल नियोजन  
 
* पाण्याचा ताळेबंद : प्रत्येक गावाने आणि शहराने उपलब्ध पाणी आणि त्याची गरज यांचा दरमहा ’जललेखा’  मांडणे गरजेचे आहे.
 
* गावांमध्ये पाणी अंदाज पत्रकानुसारच पिकांची निवड आणि पाण्याचा वापर निश्चित केला जावा, जसे की ’हिवरे बाजार’ या गावाने करून दाखवले आहे.
 
२ विहीर आणि कूपनलिका पुनर्भरण 
 
* केवळ नवीन विहिरी किंवा खोल बोअरवेल खोदण्याने पाणी मिळणार नाही, उलट त्यामुळे भूजल साठे आणखी कोरडे पडतात.
 
* पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते शेततळे, पाझर तलाव आणि उपलब्ध विहिरींमध्ये सोडून ’भूजल पुनर्भरण’ करणे हाच एकमेव शाश्वत उपाय आहे. 
 
३ पीक पद्धतीत बदल आणि आधुनिक सिंचन
 
ज्या भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे, तिथे उसासारख्या जास्त पाणी लागणार्‍या पिकांऐवजी ज्वारी, बाजरी किंवा कडधान्यांसारख्या कमी पाण्याच्या पिकांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
 
* मोकळ्या पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर सक्तीचा करावा. 
 
४ पाणलोट क्षेत्र विकास  
 
* ’पाऊस जिथे पडतो, तिथेच अडवा आणि जिरवा’ या तत्त्वानुसार काम करणे गरजेचे आहे.
 
* यासाठी डोंगराळ आणि माळरानाच्या भागात सिमेंट व मातीचे बंधारे बांधणे, नाला खोलीकरण करणे, गाळ काढणे आणि सीसीटी  खणणे यांसारखी कामे पावसाळ्यापूर्वी केली पाहिजेत. 
 
५ छत जलसंवर्धन 
 
* शहरी आणि ग्रामीण भागातील इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे गोळा करून ते साठवण टाक्यांमध्ये किंवा थेट भूगर्भात सोडले पाहिजे. यामुळे टँकरवरील अवलंबित्व कमी होते.
 
६ सांडपाण्याचा फेरवापर आणि जलसाक्षरता
 
* उद्योग आणि शहरांमधून निघणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर शेती किंवा कारखान्यांसाठी पुन्हा वापर करणे बंधनकारक केले पाहिजे.
 
* प्राथमिक शाळांपासूनच ’जलसाक्षरता’ अभ्यासक्रम सुरू करून पाण्याचा अपव्यय टाळण्याचे संस्कार रुजवावेत.  
 
थोडक्यात ’जलयुक्त शिवार’ किंवा ’बळीराजा’ सारख्या सरकारी योजनांसोबतच, जोपर्यंत लोकसहभागातून पाणी बचतीची चळवळ उभी राहत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील भूजल संकट पूर्णपणे मिटणे कठीण आहे. 
 
 - संकलन : समृद्धी धायगुडे 

Related Articles