कुर्डुवाडी-पंढरपूर मार्गावरील पुलाला पुन्हा तडे   

ठेकेदार अन् अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

कुर्डुवाडी, (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे आणि निकृष्ट बांधकामामुळे कुर्डुवाडी ते पंढरपूर या तीन पदरी सिमेंट रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. कुर्डुवाडी शहरापासून अवघ्या दीड- दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलाच्या मध्यभागी स्लॅब खचून पुन्हा एकदा मोठे तडे पडले आहेत. पुलाच्या मध्यभागी रस्त्याखाली मोठी पोकळी निर्माण झाल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या निकृष्ट कामास जबाबदार असणार्‍या ठेकेदारावर आणि निष्काळजी अभियंत्यांवर तातडीने गुन्हे  दाखल करण्याची तीव्र मागणी स्थानिक नागरिक व वाहनधारकांमधून होत आहे.
 
श्री क्षेत्र पंढरपूर येथे दर्शनासाठी बार्शी, बीड, परभणी, माजलगाव यांसह मराठवाडा व विदर्भातून येणारे हजारो वारकरी, प्रवासी, एसटी बस व अवजड वाहतुकीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. कुर्डुवाडी शहरास पंढरपूरची ’नामदेव पायरी’ आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते. मात्र, या मार्गावरील बावी आणि रोपळे या दोन गावांच्या हद्दीत गेल्या पाच वर्षांपासून रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत लटकले आहे. संपूर्ण रस्त्याला तडे गेले असून, जड वाहने जाताना पूल हादरतात व भयानक आवाज होतो. रात्रीच्या वेळी हे भगदाड न दिसल्यास गंभीर अपघात घडण्याची शक्यता आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळे स्थानिक नागरिकांनीच भगदाडाच्या ठिकाणी झाडाची फांदी रोवून वाहनधारकांना सतर्क केले आहे.
 
सुमारे सहा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या रस्त्यावर सुरुवातीपासूनच भेगा पडण्यास सुरुवात झाली होती. ठेकेदार आणि संबंधित विभागाने यापूर्वी पडलेल्या भगदाडांवर केवळ सिमेंटची डागडुजी करून वेळ मारून नेली. कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याने पुन्हा त्याच ठिकाणी स्लॅब कोसळला आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु पुलाची सद्यस्थिती अत्यंत भयावह आहे. 
 

Related Articles