ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा : प्रणिती शिंदे   

काँग्रेसचे आंदोलन   

सोलापूर, (प्रतिनिधी) : भाजपच्या राजकीय फायद्यासाठी मतदार यादीत फेरफार करून वोटचोरी करणार्‍या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करून तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच त्यांच्या कार्यकाळात मतदार याद्यांमध्ये झालेल्या फेरबदलांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, या मागण्यांसाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हा परिषद पूनम गेटसमोर जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात संताप व्यक्त केला.
 
आंदोलनादरम्यान ज्ञानेश कुमार यांच्या वेशभूषेतील व्यक्तीला प्रतीकात्मक बेड्या ठोकून निषेध करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर दणाणून गेला.
 
 प्रणिती शिंदे म्हणाल्या, काँग्रेस आज संपूर्ण देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात यावी. त्यांना ताबडतोब अटक करावी. ही आमची प्रमुख मागणी आहे. मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपच्या राजकीय फायद्यासाठी मतदार यादीत फेरफार करून वोटचोरी केली.  देशाचे नागरिक कोण आहेत हे ठरविण्याचे अधिकार नाही. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगातीलच दोन आयुक्तांनी काही निर्णयांवर आक्षेप नोंदविले. 
 
निवडणूक आयोगातीलच दोन आयुक्तांनी निर्णय प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवले असल्यामुळे ते कोणीही फेटाळू शकत नाही. निवडणूक आयोगाच्या आडून जर मतदारांच्या अधिकारांशी खेळ केला जात असेल, तर हा केवळ राजकीय पक्षाचा प्रश्न नाही; हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराचा प्रश्न आहे. या देशाचा आत्मा संविधान, लोकशाही, सर्वधर्मसमभाव आणि प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार आहे.आज देशातील शेतकरी संकटात आहे, दुष्काळ जाहीर झाला पण त्याचा कोणताही उपयोग शेतकर्‍यांना होताना दिसून येत नाही त्यामुळे तो बोगस जी आर आम्ही जाळणार आहे. देशातील मतदार याद्यांमधून चुकीच्या पद्धतीने १३ कोटींपेक्षा अधिक नावे वगळण्यात आली आहेत. 
 
देशाचा आत्मा संविधान आहे, देशाचा आत्मा लोकशाही आहे आणि देशाचा आत्मा प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार आहे. हा आत्मा कोणीही बदलू शकत नाही आणि काँग्रेस तो बदलू देणारही नाही. ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोपांची चौकशी झालीच पाहिजे, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि त्यांना ताबडतोब अटकही केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.या आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, भारत जाधव, प्रशांत साळे, सुलेमान तांबोळी, संदीप पाटील, किशोर पवार आदी उपस्थित होते.
 

Related Articles