विसर्जन घाटांवर महापालिकेकडून स्वच्छता   

चार दिवसांत ६५०० मेट्रिक टन कचरा संकलित; २९४ मेट्रिक टन निर्माल्याचे स्वतंत्र संकलन
 
पिंपरी,  : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर  महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विसर्जन घाट तसेच मिरवणूक मार्गांवर स्वच्छता, कचरा संकलन आणि निर्माल्य विलगीकरणाची विशेष यंत्रणा राबविण्यात आली. 
 
२२ ते २५ सप्टेंबर या चार दिवसांत  ६५०० मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. यासाठी सुमारे तीन हजारांहून अधिक सफाई सेवक प्रत्यक्ष कार्यरत होते. विसर्जन घाट आणि मिरवणूक मार्गांवर निर्माण होणारा कचरा तातडीने हटविण्यासाठी आरोग्य विभागाच्या स्वच्छता पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. विसर्जनाच्या दिवशी मोठी गर्दी असतानाही स्वच्छता पथकांनी सातत्याने काम करून घाट परिसर आणि मिरवणूक मार्ग स्वच्छ ठेवले.  गणेशमूर्तींना वाहण्यात आलेली फुले, हार तसेच पूजासाहित्यापासून निर्माण झालेले २९४.६५५ मेट्रिक टन निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्यात आले. 
 
निर्माल्य कचर्‍यात मिसळू नये, यासाठी विसर्जन घाटांवर स्वतंत्र निर्माल्य संकलन आणि विलगीकरणाची व्यवस्था आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही स्वच्छता सेवकांनी तत्परतेने काम सुरू ठेवत घाट परिसर तसेच मिरवणूक मार्गांची स्वच्छता केली. 
 
गणेश विसर्जनाच्या कालावधीत नागरिकांनी स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेला दिलेले सहकार्य  महत्त्वपूर्ण ठरले. अनेक नागरिकांनी निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून कचरा योग्य ठिकाणी देण्यास प्राधान्य दिल्यामुळे घाट परिसर आणि मिरवणूक मार्गांवरील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यास मदत झाली. स्वच्छतेबाबत नागरिकांनी दाखविलेली ही जागरूकता कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर, मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला कचरा तातडीने संकलित करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिलेल्या सर्व सफाई सेवक व आरोग्य विभागाच्या पथकांचे काम कौतुकास पात्र आहे. 
 
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
 

Related Articles